म्याव म्याव म्याव… इकडे धाव, तिकडे धाव ; नीतेश राणे यांचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळला

म्याव, म्याव करून लपाछपी खेळणारे भाजपचे आमदार नीतेश राणे यांना जिल्हा न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. संतोष परब खुनीहल्ला प्रकरणात अटक टाळण्यासाठी नीतेश राणे न्यायालयात गेले होते, पण न्यायमूर्ती एस. व्ही. हांडे यांनी आज त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. यानंतर राणे यांच्या शोधासाठी पोलिसांनी कंबर कसली असून मुंबई, पुणे, गोवा, दिल्ली येथे खास पथके रवाना झाल्याचे समजते. नीतेश राणे यांच्या वतीने उद्या शुक्रवारी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनअर्ज दाखल करू, अशी माहिती त्यांच्या वकिलांनी दिली. त्यामुळे म्याव म्याव करणाऱया नीतेश राणेंची अवस्था इकडे धाव तिकडे धाव अशीच झाली आहे. दरम्यान, जिल्हा न्यायालयाच्या निर्णयानंतर कणकवलीत शिवसैनिकांनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर कणकवलीत 18 डिसेंबर रोजी प्राणघातक हल्ला झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत स्वाभिमानचा पुण्यातील कार्यकर्ता सचिन सातपुते याच्यासह सहाजणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या हल्ल्याचे मुख्य सूत्रधार भाजप आमदार नितेश राणे आणि गोटय़ा सावंत ही जोडगोळीच असल्याचा जबाब फिर्यादी संतोष परब यांनी दिला होता. त्यानंतर तपासाची चक्रे फिरताच राणे-सावंत हे दोघेही गायब झाले. या दोघांच्याही वतीने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला.

27 डिसेंबर रोजी जामीन अर्जावर सुनावणी सुरू झाली. सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत आणि राणेंचे वकील अॅड. संग्राम देसाई यांनी जोरदार युक्तिवाद केला. पोलिसांनी कोर्टात सादर केलेले पुरावे आणि कागदपत्रे पाहून न्या. एस. व्ही. हांडे यांनी राणे यांचा अटकपूर्व जामीन  अर्ज फेटाळून लावला.

नारायण राणेंनीलोकप्रतिनिधीचे कर्तव्य पार पाडावे

जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्याने राणे यांना दणका बसला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आता तरी मुलगा नितेश यांना पोलिसांसमोर हजर करावे आणि एका लोकप्रतिनिधीचे, मंत्र्याचे कर्तव्य पार पाडावे, अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.

मोबाइलकनेक्शन

  • सरकारी पक्षातर्फे बुधवारी सुनावणीदरम्यान नीतेश राणे यांचे या हल्ला प्रकरणातील ‘मोबाईल’ कनेक्शन न्यायालयासमोर आणले होते. राणे यांचा स्वीय सहाय्यक राकेश परब याने संशयित आरोपी सचिन सातपुते याच्याशी तब्बल 33 वेळा मोबाईलवर बोलणे केले होते.
  • एवढेच नव्हे तर भाजपचा वेंगुर्ले तालुकाध्यक्ष मनीष दळवी हादेखील सातपुतेच्या संपर्कात होता. परब आणि दळवी हे दोघेही गायब आहेत. हे सर्व रेकॉर्ड सरकारी वकील अॅड. घरत यांनी न्यायालयात सादर केले.
  • शिवाय नीतेश राणे यांनी दरम्यानच्या काळात विविध सात मोबाईल क्रमांकांवरून संपर्क साधला होता ही बाबही तपासात उघड झाली आहे. सातही मोबाईल आणि सीमकार्ड तोडून टाकण्यापूर्वीच त्यातील डाटा रिकव्हर करणे आवश्यक असल्याचेही सरकारी वकिलांनी न्यायालयास सांगितले. न्यायमूर्तींनी हाच मुद्दा ग्राहय़ धरीत नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.

पोलीस तपासातीलमहत्त्वाच्यागोष्टी

  • नीतेश राणे यांच्याकडील सात मोबाईल हस्तगत करणे आवश्यक आहे. म्हणूनच त्यांची चौकशी व्हायला हवी.
  • राणे यांचा स्वीय सहाय्यक राकेश परब याने संशयित आरोपी सचिन सातपुते याला तब्बल 33 वेळा मोबाईलवर संपर्क साधला होता.
  • भाजपचा वेंगुर्ले तालुकाध्यक्ष मनीष दळवी हासुद्धा सातपुतेच्या संपर्कात होता.
  • नीतेश राणे, गोटय़ा सावंत यांच्याप्रमाणेच परब आणि दळवी हेसुद्धा गायब आहेत.

पोलिसांना शरण येणार?

जिल्हा न्यायालयात झटका बसल्यानंतर आमदार नीतेश राणे आता पोलिसांना शरण येणार की, पुन्हा लपून राहून उच्च न्यायालयात जामिनासाठी धावणार हा प्रश्न विचारला जात आहे. अॅड. संग्राम देसाई यांनी मात्र आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार असून तोपर्यंत राणे पोलिसांसमोर हजर होणार नसल्याचे पत्रकारांना सांगितले.