अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीबाबत संशय घेण्याचे कारण नाही; छगन भुजबळ यांचे स्पष्टीकरण

अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात झालेल्या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. या भेटीवर राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता या भेटीबाबत छगन भुजबळ यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ही भेट झाली त्या भेटीवर आक्षेप घेण्याचं कारण काय? असा सवाल भुजबळ यांनी केला आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्यात कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे ते भेटायला गेले असतील तर त्यात इतर कुणाला वाईट वाटण्याचं कारण नाही, तसेच त्याला राजकीय अर्थ देणे योग्य नसल्याचेही छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

राजकीय मतभेद असू शकतात, कौटुंबिक मतभेद आणि सामाजिक मतभेद असलेच पाहिजेत असे नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेव्हा पुण्यात आले होते. त्यावेळी राजकीय मतभेद बाजूला ठेवून शरद पवार त्या कार्यक्रमाला गेले होते, असेही छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्यात भेट झाली तर त्यात आक्षेप घेण्यासारखं काही नाही, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे.

अजित पवार आणि शरद पवार यांच्यात गुप्त बैठक झाल्याच्या बातम्या दोन दिवसांपासून येत आहेत. त्याबाबत शरद पवार यांनीही उत्तर दिलं. शरद पवार म्हणाले की अजित माझा पुतण्या आहे आणि मी आमच्या कुटुंबातला वडील सदस्य आहे. जर आम्ही भेटलो तर त्यात चुकीचं काय? असा प्रश्न विचारला आहे. या भेटीमुळे राजकीय संभ्रम निर्माण करण्यात येऊ नये, असेही भुजबळ म्हणाले.