भाजपनं उच्च न्यायालय विकत घेतलंय! ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप; 26 हजार शिक्षकांच्या नोकऱ्या रद्द केल्यानंतरचं विधान

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 26,000 शिक्षकांच्या नोकऱ्या रद्द करण्याच्या कलकत्ता उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘भाजप किंवा सीपीएम किंवा काँग्रेसला एकही मत मिळणार नाही, शिक्षकांचे नाही, कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्यांचे नाही’, असं ममता बॅनर्जी यांनी ठणकावलं.

भाजपनं उच्च न्यायालय विकत घेतलं आहे, असं म्हणतानाच सर्वोच्च न्यायालय नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. ‘मला अजूनही सर्वोच्च न्यायालयाकडून न्यायाची आशा आहे’, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

पुढे त्यावर सविस्तर बोलताना, ‘त्यांनी (भाजपनं) उच्च न्यायालय विकत घेतलं आहे. त्यांनी CBI विकत घेतली आहे. त्यांनी NIA विकत घेतली आहे. त्यांनी बीएसएफ विकत घेतली आहे. त्यांनी CAPF विकत घेतलं आहे. त्यांनी दूरदर्शनचा रंग भगवा केला आहे. ते फक्त भाजप आणि मोदींचीच भाषा बोलतील. त्यामुळे बिलकूल बघू नका, बहिष्कार टाका’, असं बॅनर्जी म्हणाल्या. असं एनडीटीव्हीच्या (संदर्भ – https://www.ndtv.com/india-news/not-one-vote-mamata-banerjees-big-message-after-26-000-teachers-lose-jobs-5515938#pfrom=home-ndtv_topscroll) वृत्तात म्हटलं आहे.

या आठवड्याच्या सुरुवातीला, कोलकाता उच्च न्यायालयाने सरकारी-प्रायोजित आणि अनुदानित शाळांसाठी 2016 ची भरती प्रक्रिया रद्द केली, कारण काही उमेदवारांनी नोकऱ्या मिळवण्यासाठी लाच दिली होती असा आरोप आहे. माजी शिक्षण मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्यासह तृणमूलचे अनेक नेते आणि माजी अधिकारी शिक्षक भरतीप्रकरणी तुरुंगात आहेत.

परंतु, एका झटक्यात या निर्णयामुळे 26,000 शिक्षक बेरोजगार झाले. त्यांना त्यांचे पगार 12 टक्के व्याजासह परत करण्यास सांगण्यात आले. या आदेशाला राज्याने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.