राहुरी तालुक्यात चोरीला गेलेल्या डंपरसह एकाला अटक

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथिल व्यवसायिक राजेंद्र लक्ष्मण मुसमाडे यांनी 30 लाख रुपये किंमतीचा अशोक लेलंड कंपनीचा हायवा डंपर चोरीला गेल्याची घटना घडली आहे. राहुरी फॅक्टरी येथील मुसमाडे यांचे पेट्रोलपंपावर लावलेला असतानां अज्ञात चोरट्याने हा डंपर चोरुन नेला आहे.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिर्डी परिसरातून डंपरसह एकास ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलीसांच्या सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, राहुरी फँक्टरी येथिल मुसमाडे पेट्रोल पंपावरुन हा डंपर 5 एप्रिल रोजी चोरीला गेला होता. राहुरी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी हा गुन्हा उघडकीस आणुन चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करणेबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना समांतर तपास करण्याचे आदेश दिले होते. पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार मनोहर गोसावी, रविंद्र कर्डीले, गणेश भिंगारदे, संतोष लोढे, पो.ना. संदीप चव्हाण, रोहित मिसाळ, प्रमोद जाधव, आकाश काळे, अमृत आढाव, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे यांचे पथक तयार करुन गुन्हा उघडकीस आणणे बाबत सांगितले.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राहुरी फँक्टरी येथिल सी.सी.टी.व्ही.फुटेज तपासणी करुन तसेच सदर हायवा ढंपरचे जी.पी.एस. वरुन माहिती घेता सदर ढंपरचे जी.पी.एस. हे खडका फाटा नेवासा येथे बंद करण्यात आल्याचे दिसुन आले. पोलिस पथकाने रोडचे फुटेजची तपासणी केली असता सी.सी.टी.व्ही.फुटेजमध्ये सदरचा डंपर हा राहुरी, घोडेगांव, नेवासा फाटा, वाळुंज पंढरपुर, वैजापुर मार्गे शिर्डी परिसरामध्ये दिसुन आला.पथकाने शिर्डी परिसरामध्ये फुटेजमध्ये ढंपरसह एक संशयीरित्या दिसुन येत असलेल्या इसमाची ओळख पटवुन त्याचे नांव प्रकाश एकनाथ कदम रा. साकुरी, ता. राहाता, जि. अहमदनगर असे असल्याचे निष्पन्न झाले. प्रकाश कदम याचा गुप्त बातमीदारामार्फत शोध घेतला असता तो मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडे ढंपरबाबत सखोल चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याचे साथीदार समीरखान नसिरखान पठाण, रा. खंडाळा, ता. वैजापुर, जि. छ. संभाजीनगर व त्याचे इतर दोन अनोळखी साथीदार एकञित केला असल्याचे सांगितले.

प्रकाश कदम याच्याकडे डंपरबाबत विचारपुस करता त्याने सदरचा डंपर हा नाला नंबर 32 वरील जाधव वस्ती जवळ,रुई शिवार, ता. राहाता या ठिकाणी काटवनात लावलेला असल्याचे सांगितले. सदर ठिकाणी जावुन खात्री केली असता काटवनामध्ये डंपर मिळुन आला आहे. या गुन्ह्यातील समीरखान पठाण व त्याचे इतर दोन अनोळखी साथीदारांचा शोध घेता असता ते मिळुन आले नाही. चोरीच्या गुन्ह्यात प्रकाश एकनाथ कदम यास व चोरी गेलेला 30 लाख रुपये किमतीचा अशोक लेलंड कंपनीचा हायवा डंपर पुढील तपासकामी राहुरी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला आहे.पुढील तपास राहुरी पोलीसचे पोलीस करीत आहेत.