ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; चार कोटी क्रिप्टोकरन्सीद्वारे हाँगकाँगला

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या पाच जणांच्या टोळीचा पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलने पर्दाफाश केला. या टोळीने फसवणूक करून मिळवलेले चार कोटींहून अधिक रुपये क्रिप्टोकरन्सीद्वारे हाँगकाँगला पाठविल्याचे तपासात समोर आले आहे. आरोपींकडून सात मोबाईल, रोकड मोजण्याची मशिन, आठ डेबिट कार्ड, 12 धनादेश, एक पासबुक आणि सात लाखांची रोकड जप्त केली. आरोपींकडे 120 पेक्षा अधिक बँक खाती असल्याचे उघड झाले आहे.

जुनेद मुख्तार कुरेशी (वय 21, रा. टिंगरेनगर), सलमान मन्सूर शेख (वय 22, रा. इंदिरानगर, लोहगाव रोड), अब्दुल अजीज अन्सारी (वय 23, रा. इंदिरानगर, लोहगाव रोड), आकिफ अन्वर अरिफ अन्वर खान (वय 29, रा. कोंढवा खुर्द), तौफिक गफ्फार शेख (वय 22, रा. इंदिरानगर, लोहगाव रोड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. फिर्यादी महिलेला 22 फेब्रुवारी रोजी इन्स्टाग्रामवर शेअर मार्केट क्लासेस आणि शेअर मार्केट गुंतवणूकसंदर्भात एक जाहिरात दिसली. त्यांनी त्यावर क्लिक केले. त्यानंतर फिर्यादीला ‘स्कॉडर अॅकॅडमी व्हीआयपी 34’ या व्हॉट्सअॅप ग्रुपला जॉईन करण्यात आले. आरोपींनी एक फॉर्म पाठवून त्यांचे अकाउंट काढले. त्यानंतर शेअर मार्केटमध्ये कंपन्यांचे आयपीओ खरेदी करण्यासाठी फिर्यादी महिलेने वेगवेगळ्या बँक खात्यांवर 31 लाख 60 हजार रुपये गुंतवणूक केली. फिर्यादी यांनी काही दिवसांनंतर गुंतवलेली रक्कम परत मागितली असता ती रक्कम देण्यासाठी आरोपींनी चॅरिटी डोनेशन म्हणून आणखी चार लाख रुपये घेतले. मात्र, ही रक्कम परत न देता महिलेची एकूण 35 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी महिलेने फिर्याद दिली होती. या गुन्ह्याचा समांतर तपास पिंपरी – चिंचवड सायबर सेलकडून केला जात होता.

महिलेने ज्या बँक खात्यांवर पैसे पाठविले होते, त्या खात्यांचे सायबर सेलने तांत्रिक विश्लेषण करून पाचजणांना अटक केली. पाच जणांकडे 120 पेक्षा जास्त बैंक खाती आढळून आली. या सर्व खात्यांवर आरोपींनी फसवणुकीच्या वेगवेगळ्या प्रकारणांमधील पैसे घेतले आहेत. बँक खात्यात पैसे आल्यानंतर आरोपी ते पैसे काढून घेत. त्यानंतर ते यूएसडीटी या क्रिप्टोकरन्सीमार्फत हाँगकाँगला पाठवत असत. आरोपींनी आतापर्यंत चार कोटी रुपयांहून अधिक रुपये हाँगकाँग येथील म्होरक्याला क्रिप्टोच्या माध्यमातून पाठविले आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहायक आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी, फौजदार सागर पोमण, नितेश बिचेवार, अतुल लोखंडे, श्रीकांत कबुले, कृष्णा गवळी, रजनीश तारू, सौरभ घाटे, आशा सानप, ईश्वरी आंभरे यांनी केली.

हाँगकाँगमधून चालतेय फसवणुकीचे नेटवर्क
या प्रकरणातील मुख्य आरोपी ग्रेग हा हाँगकाँग येथे वास्तव्यास आहे. तिथून तो हे फसवणुकीचे नेटवर्क चालवतो. हाँगकाँगमधून सोशल मीडियासाठी जाहिराती आणि लिंक तयार केल्या जातात. त्या जाहिराती पाहून कोणी संपर्क केल्यास त्या नागरिकांना लगेच फोन येण्यास सुरुवात होते. शेअर मार्केटमधील गुंतवणूक सुरक्षित आणि फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. त्याद्वारे व्यक्तीकडून गुंतवणुकीच्या बहाण्याने लाखो रुपये घेतले जातात. हे पैसे स्थानिक बँक खात्यांवर घेतले जातात. स्थानिक पातळीवर जुनेदप्रमाणे काही सदस्य कार्यरत असतात. त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना पैशांचे आमिष दाखवून त्यांचे बँक खात्याचे तपशील घेतलेले असतात. त्यावर फसवणुकीची रक्कम घेतली जाते आणि रक्कम खात्यावर येताच ती तत्काळ काढून घेतली जाते. त्यानंतर तिचे क्रिप्टोमध्ये रूपांतर करून हाँगकाँगला पाठवले जाते. याचे स्थानिक सदस्यांना ठराविक कमिशन मिळत असल्याचे समोर आले आहे.