पाकिस्तानी वायुदलाचा इराणवर हल्ला, बलूच लिबरेशन आर्मीचे तळ उद्ध्वस्त; नऊ जणांचा मृत्यू

पाकिस्तानी वायुदलाने इराणला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सारवान प्रांतात असलेल्या बलूच लिबरेशन आर्मीच्या तळांवर पाकिस्तानी विमानांनी आग ओकली. देशाच्या सुरक्षेसाठी हा हल्ला करण्यात आल्याचे समर्थन पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे. तर पाकिस्तानच्या हल्ल्यात चार लहान मुले, तीन महिलांसह नऊ जण ठार झाल्याचा दावा इराणने केला आहे. यापैकी कोणीही इराणी नागरिक नसल्याचे म्हटले आहे.

मंगळवारी रात्री इराणने पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात अचानक सर्जिकल स्ट्राईक करून ‘जैल अल अदल’ संघटनेचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. या हल्ल्यात अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा इराणने केला होता. इराणने सार्वभौमत्वावर हल्ला केल्याचा ठणाणा करत पाकिस्तानने जोरदार प्रत्युत्तर देणार असल्याचे म्हटले होते.

ऑपरेशन मार्ग बार सरमाचर

गुरुवारी पहाटे पाकिस्तानने ‘ऑपरेशन मार्ग बार सरमाचर’ सुरू केले. पाकिस्तानी वायुदलाच्या लढाऊ विमानांनी इराणच्या सारवान प्रांतात बलूच लिबरेशन आर्मीच्या तळांवर हल्ला चढवला. सिस्तान, सारवान या भागांत वास्तव्य करून असणारे अनेक अतिरेकी या हल्ल्यात ठार झाल्याचा दावा पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताज बलोच यांनी केला. देशाच्या रक्षणार्थ ही कारवाई करण्यात आल्याचेही त्यांनी आवर्जुन सांगितले.

दोन्ही देशांत तणाव वाढला

इराणने सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानने तेहरान येथून आपल्या राजदूताला माघारी बोलावले होते. त्याचबरोबर इराणच्या राजदूतालाही पाकिस्तान सोडण्याचे फर्मान सोडण्यात आले. पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द करून लष्करी अधिकार्‍यांची तातडीची बैठक बोलावली.

जर एखादा देश आपल्या रक्षणासाठी कारवाई करत असेल तर त्याची परिस्थिती आम्ही समजू शकतो. इराण आणि पाकिस्तानचा हा अंतर्गत मामला आहे. परंतु दहशतवादाचे समर्थन कदापि होऊ शकत नाही. –
रणधीर जायसवाल, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता

इराणने केलेला सर्जिकल स्ट्राईक चुकीचा आहे. इराणने अलीकडेच आपल्या शेजारील तीन राष्ट्रांच्या सार्वभौमत्वाचा अनादर केला आहे. -मॅथ्यू मिलर, अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता

पत्रकारांना घटनास्थळावर जाण्यास मनाई

इराणने हल्ला केलेल्या बलुचिस्तानातील पंजगुर आणि तुरबत या घटनास्थळावर जाण्यास पत्रकारांना मनाई करण्यात आली आहे. पाकिस्तानने रातोरात ही दोन्ही ठिकाणे सीलबंद केली असून, त्याठिकाणी चौक्या लावण्यात आल्या आहेत. हिंदुस्थानने बालाकोटमध्ये सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतरही पाकिस्तानने तीन महिने तो परिसर निर्मनुष्य ठेवला होता. मोजक्या पत्रकारांना काही तुटलेली झाडे दाखवून सत्य लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न पाकिस्तानने केला होता.