श्री विठ्ठल मंदिर मालकी हक्कावरून वाद-प्रतिवाद, पंढरपूर टेम्पल ऍक्टविरोधी याचिका न्यायालयाने फेटाळावी

महाराष्ट्र शासनाने श्री विठ्ठल मंदिराचा ताबा घेतल्यापासून वारकरी, भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मंदिर व्यवस्थापनाने भाविकांसाठी मोठय़ा प्रमाणात सेवा-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मंदिरामध्ये भाविकांना मिळणारी हीन वागणूक, आर्थिक पिळवणूक आदींना लगाम बसला आहे. सर्व काही सुरळीत सुरू असताना भाजप नेते माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी श्री विठ्ठल मंदिर शासनाच्या ताब्यातून काढून घेण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ही याचिका वारकरी, भाविकांचा अनादर करणारी आहे. मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावावी, असा ठराव वाखरी ग्रामपंचायतीने ग्रामसभेत केला आहे.

मुंबई उच्च न्यायालयात सुब्रमण्यम स्वामी यांनी पंढरपूर टेम्पल ऍक्ट रद्द करून श्री विठ्ठल मंदिर खासगी करण्याच्या मागणीसाठी याचिका दाखल केली आहे. या पार्श्वभूमीवर वाखरी ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांनी हा ठराव मंजूर केला आहे. वाखरी ग्रामपंचायतीची स्वातंत्र्य दिनानिमित्त घेण्यात येणारी ग्रामसभा सोमवारी (दि. 28) सकाळी 11 वाजता सरपंच धनश्री साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली. मागील सभेचा इतिवृतांत वाचून सभेच्या कामकाजास सुरुवात करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य संजय अभंगराव यांनी पंढरपूर मंदिरे अधिनियम 1973 हा वारकरी हिताचा, विठ्ठल-रुक्मिणी देवस्थानच्या विकासाचा असून, हा कायदा रद्द झाल्यास मंदिराचे खासगीकरण होणार आहे. त्यामुळे हा कायदा कायम राहावा, यासाठी मुंबई उच्च न्यायालयास विनंती करणारा आणि राज्य शासनास समर्थन देणारा ठराव मांडला. यावेळी सर्व ग्रामस्थांनी एकमताने या ठरावास मंजुरी दिली.

वाखरी गावातील 7 युवकांनी स्थापत्य अभियांत्रिकी पूर्ण केलेले असून ग्रामपंचायतकडील बांधकाम कामे गावातीलच अभियंत्यांना देण्याचाही ठराव केला आहे. याशिवाय गावात 7 हजारांहून अधिक पशुधन आहे; परंतु त्यांच्यासाठी गावात जनावरांचे शासकीय डॉक्टर नाहीत, त्यामुळे गावात पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्याची मागणी करणारा ठराव रामचंद्र पांढरे यांनी मांडला आणि तो ठराव मंजूर करण्यात आला. गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेवक आणि आरोग्यसेविकांच्या सर्वच जागा रिक्त आहेत, त्या जागी आवश्यक त्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जावी, असाही ठराव करण्यात आला. यावेळी उपसरपंच संजय लेंगरे यांच्यासह मोठय़ा संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामविकास अधिकारी सावता शिंदे यांनी सभेचे कामकाज चालवले.