क्रिकेटचा पाया भक्कम करण्यासाठी दीर्घकालीन क्रिकेट अधिक खेळा; वेंगसरकरांचा शालेय क्रिकेटपटूंना मोलाचा सल्ला

12 वर्षांखालील मुलांच्या एजिस फेडरल  इन्शुरन्स कप क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात 35 षटकांच्या सामन्यात एक संघ केवळ 72 धावांत बाद होणे हे चांगले लक्षण नाही.  तुम्हाला जर चांगले आणि वरच्या स्तरावरचे क्रिकेट खेळायचे असेल तर दीर्घकाळ खेळपट्टीवर राहून मोठया खेळी करणे, त्यासाठी स्टॅमिना आणि मनोनिग्रह या गोष्टीवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे, असे हिंदुस्थानचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी सांगितले.  या वयातच तुम्ही दोन-दोन दिवसांचे सामने खेळण्याला पसंती दिलीत तर तुमचा पाया भक्कम होईल, असेही त्यांनी पुढे सांगितले.  माहुल, चेंबूर यथे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत अचिव्हर्स क्रिकेट अकादमी संघाने  ठाण्याच्या जी.ए.ई.टी. स्पोर्ट्स क्लब संघावर 7 विकेट्सनी आरामात मात करून विजेतेपद पटकावले. प्रतिस्पर्धी संघाला 72 धावांत गुंडाळत त्यांनी हे आव्हान केवळ 13.3 षटकांत तीन विकेट्सच्या मोबदल्यात पार केले.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करणाऱया जी.ए.ई.टी. स्पोर्ट्स क्लब संघाला अचिव्हर्स क्रिकेट अकादमीच्या शौनक गावडे (11 धावांत 2 बळी) आणि अमेय महाडिक (16 धावांत 2 बळी) यांच्या अचूक गोलंदाजीचा सामना करणे जड गेले.  या स्पर्धेत चांगली कामगिरी करणारा मानव पोकर (23) आणि वेदांत आनंद (नाबाद 15) यांचा अपवाद वगळता त्यांच्या अन्य फलंदाजांनी पार निराशा केली आणि त्यांचा डाव 25.5 षटकांत 72 धावांतच आटोपला. या आव्हानाचा पाठलाग करताना अचिव्हर्स क्रिकेट अकादमीने देखील 27 धावांत 3 विकेट्स गमावल्या होत्या, मात्र अर्जुन संघवी (नाबाद 32) आणि निषाद परब (नाबाद 15) या जोडीने चौथ्या विकेटसाठी 46 धावांची अभेद्य भागी रचून संचाचा विजय साजरा केला.

संक्षिप्त धावफलक ः  जी.ए.ई.टी. स्पोर्ट्स क्लब – 25.5 षटकांत सर्व बाद 72 (मानव पोकर 23, वेदांत आनंद नाबाद 15 ; शौनक गावडे 11 धावांत 2 विकेट, अमेय महाडिक 16 धावांत 2 विकेट) पराभूत वि. अचिव्हर्स क्रिकेट अकादमी – 13.3 षटकांत 3 बाद 73 (अर्जुन संघवी नाबाद 32, निषाद परब नाबाद 15).