चांद्रयान-3 मोहिमेतून आणखी एक यश; चंद्रावर सल्फर असण्याच्या शक्यतेला मिळाली पुष्टी

chandrayaan-3-sulphur-test

हिंदुस्थानची अंतराळ संशोधन संस्था इस्रोच्या (ISRO) चांद्रयान-3 मोहिमेतून संशोधनास मोठी चालना मिळत आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा आणि संशोधन करणारा हिंदुस्थान हा पहिला देश ठरला असून संशोधनाच्या कामानंही वेग घेतला आहे. त्यातून चंद्रासंदर्भात नवनवीन माहिती समोर येऊ लागली आहे. विक्रम लँडरचं सॉफ्ट लँडिंग झाल्यानंतर प्रज्ञान रोव्हरनं पुढील वाटचाल सुरू केली आहे. प्रज्ञानच्या मदतीनं सुरू असलेल्या संशोधनात चंद्रावर सल्फर आणि इतर घटकांच्या उपस्थितीची पुष्टी केली आहे. इस्रोनं चांद्रयान-3 मोहिमेचा एक भाग म्हणून या यशाची घोषणा केली.

प्रज्ञानवरील लेझर-इंड्युस्ड ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोप (LIBS) या साधनाच्या मदतीनं तिथं सल्फर असल्याची पुष्टी करण्यात आली आहे. एलआयबीएस इन्स्ट्रुमेंटचे निष्कर्ष आणखी एका ऑनबोर्ड इन्स्ट्रुमेंट, अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोस्कोप (एपीएक्सएस) द्वारे तपासण्यात आले, ज्यामध्ये इतर किरकोळ घटकांसह सल्फरच्या अस्तित्वा बद्दलची माहिती देखील मिळाली आहे.

मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरवर इस्रोनं लिहिलं आहे की, ‘रोव्हरवरील आणखी एक साधनाच्या दुसर्‍या तंत्राद्वारे या भागात सल्फर (एस) आढळल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोस्कोप (APXS) ने सल्फर तसेच इतर किरकोळ घटक शोधले आहेत. चांद्रयान-3 चा हा शोध शास्त्रज्ञांना या भागात आढळलेल्या सल्फरच्या स्त्रोताचा शोध घेण्यासाठी चालना देत आहे. मात्र त्याच्या उपस्थितीचं कारण आंतरिक?, ज्वालामुखी?, उल्का?,……? की अन्य काही याच आहे, असे नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत.’

इस्रोनं चांद्रयान-3 रोव्हरचा एक व्हिडीओ देखील शेअर केला आणि लिहिले, “व्हिडीओमध्ये 18 सेमी उंच APXS फिरवणारी स्वयंचलित यंत्रणा दाखवली आहे, डिटेक्टर हेड चंद्राच्या पृष्ठभागाच्या जवळपास 5 सेमी आहे. PRL अहमदाबादने APXS विकसित केलं आहे. तर URSC, बेंगळुरूनं तैनाती यंत्रणा विकसित केली आहे.’

या निष्कर्षांमुळे शास्त्रज्ञांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. आता या प्रदेशातील सल्फरचा स्त्रोत स्पष्ट करण्यासाठी नवीन सिद्धांत विकसित करण्याचं काम देण्यात आले आहे. चंद्राची रचना, ज्वालामुखी किंवा अगदी उल्कापाताचा प्रभाव यापासून सफ्लर येथे असण्याची शक्यता संशोकांना वाटते.