महाविकास आघाडीच्या बैठकीला प्रकाश आंबेडकरांची उपस्थिती, भाजपचा पराभव हाच अजेंडा!

देशातील संविधानविरोधी वातावरण संपवण्यासाठी महाविकास आघाडीची मजबुती कायम राखणे ही काळाची गरज असून त्यासाठी सर्वांनी मिळून काम करायचे, असा एकमुखी निर्णय आज महाविकास आघाडीच्या बैठकीत घेण्यात आला. जागावाटपासह विविध मुद्दय़ांवर यावेळी सकारात्मक चर्चा झाली. जागावाटपाला नव्हे, तर भारतीय जनता पक्षाच्या पराभवाला आमची प्राथमिकता आहे असे बैठकीनंतर आघाडीच्या नेत्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी बैठकीची माहिती माध्यमांना दिली. आजच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. महाराष्ट्रातील राजकीय वातावरण गटांगळय़ा खातेय. देशातही हुकूमशाहीचे वातावरण आहे. संविधानविरोधी वातावरण आहे. ते संपवून संविधानाच्या रक्षणासाठी एकत्र राहून काम करायचे असा निर्धार आजच्या बैठकीत करण्यात आला, असे संजय राऊत म्हणाले. भारतीय जनता पक्षाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत होईल अशी कोणतीही पावले उचलायची नाहीत यावरही बैठकीत एकमत झाले, असे ते पुढे म्हणाले.

जागावाटपाबाबत माध्यमांनी विचारले असता, जागावाटप हा आमचा इश्श्यू नाही. आमच्यात फार मतभेद नाहीत. भाजपचा संपूर्ण पराभव करणे हीच आमची प्राथमिकता आहे, असे ते म्हणाले.

तृणमूल, आप इंडिया आघाडीतच
इंडिया आघाडीतील घडामोडींबाबत माध्यमांनी विचारले असता संजय राऊत म्हणाले की, इंडिया आघाडी देशपातळीवर काम करत आहे. जागावाटपावरून तृणमूल काँग्रेस किंवा आपने काही निर्णय घेतले असतील तर ते केवळ धोरणात्मक आहेत. तृणमूल आणि आप हे आजही इंडिया आघाडीतच आहेत. ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालमध्ये भाजपचा पराभव करण्यास सक्षम आहेत.

लोकसभा निवडणुकीत कुणाबरोबर आघाडी करायची याची चाचपणी करतोय असे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले होते. त्याबद्दल माध्यमांनी विचारले असता, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करू पाहणाऱयांबरोबर जायचे की महाराष्ट्र एकसंध ठेवणाऱयांबरोबर जायचे हे त्यांनी ठरवावे, असा सल्ला संजय राऊत यांनी दिला.

इंडिया आघाडीत सहभागाबद्दलही माध्यमांनी यावेळी प्रकाश आंबेडकर यांना विचारले. त्यावर, आमचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र आहे. महाविकास आघाडीत चांगला समन्वय राहील याची काळजी घेऊ. ताक जरी असले तरी फुंकून फुंकून प्यायचे आम्ही ठरवले आहे, असे उत्तर प्रकाश आंबेडकर यांनी दिले.

महाविकास आघाडीची बैठक आज ट्रायडंट हॉटेलमध्ये पार पडली. आजच्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि रेखा ठाकूर हेसुद्धा उपस्थित होते. बैठकीनंतर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

जाहीरनामा ठरवण्यासाठी समिती नेमणार
महाविकास आघाडीचा समान किमान कार्यक्रम म्हणजेच जाहीरनामा ठरवण्यासाठी एका समितीची नेमणूक केली जाणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. प्रकाश आंबेडकर यांनी सामाजिक तसेच शेतकरी, कष्टकरी यांच्याबाबत काही सूचना मांडल्या असून त्यांचा समावेश जाहीरनाम्यात केला जाईल, असे संजय राऊत म्हणाले. प्रकाश आंबेडकर यांनी मांडलेली भूमिका आणि सूचनांवर चर्चा करून लवकरच पुन्हा भेटणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

वंचितची पुढच्या आठवडय़ात काँग्रेस श्रेष्ठींशी बोलणी
महाविकास आघाडीत वंचितच्या प्रवेशाबद्दल यावेळी माध्यमांनी प्रकाश आंबेडकर यांना विचारले. त्यावर ते म्हणाले की, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आम्ही आहोतच. पुढील आठवडय़ात काँग्रेसचे वरिष्ठ नेते येणार असून त्यावेळी यासंदर्भात त्यांच्याशी बोलणी होणार आहेत. आपण काही मुद्दे आजच्या बैठकीत ठेवले असून त्यावर प्रमुख पक्षांची चर्चा सुरू आहे. पुढील बैठकीत लोकसभेच्या जागावाटपापूर्वी चर्चा करून किमान समान कार्यक्रम ठरवला जाणार आहे, असे ते म्हणाले.

आठ दिवसांत जाहीरनामा – नाना पटोले
महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीत प्रकाश आंबेडकर यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. चर्चेत आंबेडकर यांनी काही मुद्दे मांडले आहेत. त्यांचे व आमचे अनेक मुद्दे समान आहेत. यातूनच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्याचा निर्णय झाला असून किमान समान कार्यक्रम ठरवला जाईल. या समितीत सर्व घटक पक्षांच्या सदस्यांचा समावेश असेल. आठ दिवसांत ही समिती अहवाल सादर करेल असे नाना पटोले म्हणाले.

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस नेते अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे स्वागत केले.