धारावी पुनर्वसनाचा आरोग्य, पर्यावरणावर दुष्परिणाम; मुलुंडकरांची घरोघरी जनजागृती मोहीम

राज्य सरकार 4 लाख धारावीकरांचे मुलुंडमधील महापालिकेच्या 64 एकर जागेवर पुनर्वसन करणार आहे. मात्र यामुळे केवळ पायाभूत सुविधांवरच ताण पडणार नाही तर मुलुंडकरांच्या आरोग्य आणि इथल्या पर्यावरणावरही दुष्परिणाम होणार आहे. याविरोधात ‘प्रयास’ या संस्थेच्यावतीने घरोघरी जाऊन जनजागृती मोहीम राबवली जात आहे.

मुलुंडमध्ये प्रकल्पबाधितांसाठी बांधण्यात येत असलेल्या वसाहतींमुळे केवळ लोकसंख्येची वाढ होणार नाही तर सर्वच प्रकारच्या सोयीसुविधांवर प्रचंड ताण येणार आहे. त्यात मुलुंड पूर्वेकडील वझे-केळकर कॉलेज परिसरात प्रकल्पबाधितांसाठी साडेसात हजार सदनिका बांधण्यात येणार आहेत. यामुळे मुलुंडच्या लोकसंख्येत 50 ते 60 हजारांची भर पडणार आहे. त्यात आता धारावी पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांसाठी मुलुंड डम्पिंग ग्राऊंड आणि जकात नाका अशी दोन्ही मिळून 64 एकरवर घरे बांधण्यात येणार आहेत. त्याला मुलुंडकरांनी जोरदार विरोध केला आहे. सरकारच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी ‘प्रयास’ या सामाजिक संस्थेच्यावतीने 4 फेब्रुवारीला मूक मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात हजारो रहिवाशी सहभागी झाले होते.

प्रकल्पाविरोधात जनमत

मुलुंडमधील सर्व सोसायटय़ांमध्ये रविवारपासून जनजागृती करण्याचे काम सुरू झाले आहे. मुलुंड पश्चिम आणि पूर्वमधील गृहनिर्माण संकुलांमध्ये मोहीम राबवण्यात आली. दरम्यान, संस्थेचे स्वयंसेवक सोसायटय़ांमध्ये जाऊन रहिवाशांना प्रकल्पांची माहिती देऊन प्रकल्पाविरोधात जनमत तयार करण्यात येत आहे, अशी माहिती ‘प्रयास’चे अध्यक्ष अॅड. सागर देवरे यांनी दिली.

‘एल्गार मुलुंडकरांचा’

मुलुंडमध्ये होणाऱया प्रकल्पांना विरोध करण्यासाठी कायदेशीर लढाईबरोबरच जनआंदोलन उभे करण्याच्या हेतूने संस्थेचे सभासद काम करत आहेत. मोठय़ा प्रमाणात नागरिक या चळवळीत सहभागी होत असून लवकरच ‘एल्गार मुलुंडकरांचा’ ही जाहीर सभा आयोजित करण्यात येणार आहे. या सभेला अनेक मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती प्रयास संस्थेने दिली.