जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलचा प्रीव्ह्यू

साहित्य क्षेत्रात अत्यंत लोकप्रिय अशा जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलच्या  17व्या पर्वाबद्दल उत्कंठा वाढत चालली आहे. हा महोत्सव गुलाबी जयपूर शहरातील हॉटेल क्लार्क्स अमेर येथे 1 ते 5 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. या पार्श्वभूमीवर महोत्सवाचे निर्माते टीमवर्क आर्टसने नुकतेच मुंबईत एका प्रीह्यू कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.

महोत्सवातर्फे 2024 सालातील पर्वासाठी अधिकृत बुकस्टोअर म्हणून क्रॉसवर्ड बुकस्टोअर्सची घोषणा करण्यात आली. या सोहळ्यामध्ये सर्वाधिक खपाच्या पुस्तकांचे लेखक आणि लंडनमधील नेहरू सेंटरचे संचालक अमीष यांच्याशी आणि टीमवर्क आर्ट्सचे एमडी संजॉय के. रॉय यांनी संवाद साधला. पर्क्युशनिस्ट  व्लादिमिर टॅराव्होस आणि सेक्सापहनिस्ट ल्युडास मोक्युनास यांनी रोमहर्षक जाझ सादरीकरण केले.

जयपूर लिटरेचर फेस्टमध्ये कोणते कार्यक्रम होतील, याबाबत यावेळी माहिती देण्यात आली. कला व संस्कृती यासंदर्भात विविध सत्रे होणार आहेत. लिटफेस्टमध्ये राजा रविवर्मा  यांच्या कलेतील अलौकिकता उलगडणारे गणेश व्ही. शिवस्वामी यांचे सत्र होईल. आणखी एक सत्र लिओनार्दो दा विंची यांना समर्पित असेल. याशिवाय दिवंगत अभिनेता इरफान खान यांच्यावर खास सत्र असेल. यामध्ये इरफानची पत्नी सुतपा सिकदर आणि विशाल भारद्वाज सहभागी होतील. आणखी एका सत्रामध्ये, पुलित्झर पारितोषिक विजेते लेखक काइ बर्ड त्यांच्या लेखक म्हणून जगलेल्या आयुष्यावर तसेच साहित्यिक प्रवासावर बोलणार आहेत. हिंदुस्थानचे 13 वे राष्ट्रपती प्रवण मुखर्जी यांची कन्या शर्मिष्ठा मुखर्जी वडिलांच्या आठवणी सांगणार आहेत.