दुधाला लिटरमागे 40 रुपये दर द्या अन्यथा गनिमी काव्याने आंदोलन करू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा

खासगी दूध प्रकल्पवाले शेतकऱ्यांना लुबाडण्याचे धोरण राबवित असून लोकप्रतिनिधी मात्र बघायची भूमिका घेत आहेत. दुधाला लिटरमागे 40 रुपये दर मिळाला नाही तर संघर्ष तीव्र करावां लागेल. हा प्रश्न सामंजस्याने मिटविला नाही तर कायदा हातात घेऊन गनिमी काव्याने आंदोलन करू, वेळप्रसंगी जेलमध्येही बसू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी दिला आहे.

दूध दरासंदर्भात सर्व विरोधीपक्षीय कार्यकर्त्यांनी मंचर शहरातून आज मोर्चा काढला. या मोर्चामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस, आम आदमी पार्टी व मनसेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमधून मोर्चाला सुरुवात झाली. पुणे नाशिक महामार्ग, लक्ष्मी रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज चौक, धर्मवीर संभाजी महाराज चौक या मार्गे मोर्चा पिंपळगाव फाटा येथील प्रांत अधिकारी कार्यालयाकडे आला. तेथे झालेल्या सभेत बांगर बोलत होते. शेतकऱ्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. यावेळी माजी सभापती देवदत्त निकम, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक ॲड अविनाश राहणे, राजाराम बाणखेले, तालुकाप्रमुख दिलीप पवळे , नंदू बोराडे, काँग्रेसचे अशोक काळे, गणेश खानदेशे, कामगार नेते बाळासाहेब बाणखेले, राजू बेंडे पाटील, अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हा सरचिटणीस डॉ. अमोल वाघमारे, वनाजी बांगर आदी उपस्थित होते.

प्रभाकर बांगर म्हणाले दूध उत्पादक शेतकऱ्यांना लुटण्याचे धोरण खाजगी दूध प्रकल्पवाले करत असतानाही लोकप्रतिनिधी बघ्याची भूमिका घेत आहेत. तालुक्याला मंत्रीपद मिळूनही रस्त्यावर उतरण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. राज्य सरकारने हस्तक्षेप करून दुधाला 40 रुपये लिटरमागे दर द्यावा अन्यथा संघर्ष अटळ आहे. वेळप्रसंगी कायदा हातात घेऊन गनिमी काव्याने आंदोलन केले जाईल. जेलमध्येही बसू असा इशारा त्यांनी दिला. पशुखाद्याचे दर कमी करा अशी मागणी बांगर यांनी केली. देवदत्त निकम म्हणाले केंद्र व राज्य सरकार हे शेतकऱ्याच्या बाजूचे नसून विरोधी आहे. लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कांदा निर्यात बंद करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कांदा बराखित सडू लागला आहे. शेतकरी अक्षरशः मेटाकूटीला आला आहे. हेच का ते अच्छे दिन असा सवाल त्यांनी केंद्र सरकारला केला. राजाराम बाणखेले म्हणाले आपण एकसंघ राहून शेतकऱ्यांच्या बाजूने सरकारला जाब विचारू, हा लढा भाजपा पराभूत होईपर्यंत सुरू राहील. देशातील शेतकरी वाचवण्यासाठी भाजपा हद्दपार करावे लागेल. यावेळी अशोक काळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना निवेदन देण्यात आले. यासंदर्भात योग्य पाठपुरावा करण्याचे आश्वासन प्रांत शिंदे यांनी आंदोलकांना दिले.