माजी पंतप्रधान देवेगौडांच्या नातवाचे सेक्स स्कँडल, शेकडो व्हायरल व्हिडीओमुळे खळबळ; भाजपचे टेन्शन वाढले

कर्नाटकातील जनता दलाचे खासदार आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नातू प्रज्वल रेवन्ना यांचे सेक्स स्पँडल उजेडात आणणारे शेकडो व्हीडीओ व्हायरल झाले आहेत. यानंतर रेवण्णा यांनी जर्मनीला पळ काढल्याचे वृत्त आहे. यंदा लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने त्यांना हसन लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.

लोकसभा निवडणुकीतील प्रचाराची रणधुमाळी वाढत असतानाच उजेडात आलेल्या या घडामोडींमुळे भाजपची पंचाईत झाली आहे. कर्नाटक सरकारने एसआयटीमार्फत चौकशीची घोषणा केली आहे. प्रारंभी रेवन्ना यांनी व्हायरल व्हीडीओमध्ये छेडछाड केल्याचा आरोप केला होता. त्यांनीही तक्रार दाखल केल्याची चर्चा सुरू असतानाच आता ते देश सोडून जर्मनीला पळाल्याची चर्चा आहे.

रेवन्ना आणि प्रज्वलवर लैंगिक छळ आणि पाठलागाचा गुन्हा

भाजपची झोप उडवणाऱया सेक्स स्कँडलप्रकरणी माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा मुलगा आणि माजी मंत्री एचडी रेवन्ना आणि नातू हसनचे खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्याविरुद्ध रविवारी लैंगिक छळ आणि पाठलाग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. रेवन्ना यांच्या पत्नीची नातेवाईक असलेल्या स्वयंपाकी बाईने दिलेल्या तक्रारीवरून जिह्यातील होलेनरसीपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेने काम सुरू केल्यानंतर एचडी रेवन्नाने तिचा चार महिने लैंगिक छळ केला आणि मुलगा प्रज्वल तिच्या मुलीला व्हिडीओ कॉल करून ’अश्लील संभाषण’ करायचा, असे तिने तक्रारीत म्हटले आहे. तसेच तिच्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या जीवाला धोका असल्याचा आरोपही तिने केला आहे.

हसन लोकसभा मतदारसंघाचे रेवन्ना विद्यमान खासदार

जनता दल (धर्मनिरपेक्ष) या देवेगौडा यांच्या पक्षाने भाजपच्या एनडीएशी युती केल्यानंतर रेवण्णा यांना एनडीएने त्यांच्याच हसन लोकसभा मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी दिली आहे. आता त्यांची उमेदवारी अडचणीत आली आहे.

विशेष तपास पथक नियुक्त

हसन जिह्यात महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याच्या अश्लील व्हीडीओ क्लिप फिरत आहेत. यामुळे या प्रकरणी स्थापन सीआयडी विंग एसआयटीचे नेतृत्व आयपीएस अधिकारी विजय कुमार सिंह करणार आहेत. महासंचालक सीआयडी सुमन डी पेन्नेकर आणि आयपीएस अधिकारी सीमा लाटकर या टीमचे सदस्य असतील, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शनिवारी रात्री उशिरा एक्सवर एका पोस्टद्वारे सांगितले.

एचडी कुमारस्वामींनी हात झटकले

मी असो किंवा एचडी देवेगौडा, आम्ही नेहमीच महिलांचा आदर करतो आणि जेव्हा जेव्हा त्या तक्रारी घेऊन येतात तेव्हा आम्ही त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे, असे सांगत कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि रेवण्णाचे काका एचडी कुमारस्वामी यांनी हात झटकले. एसआयटी तपासातून काय समोर येते ते आधी पाहू म्हणत त्यांनी पुतण्याच्या या ‘काम’गिरीवर काही बोलायला नकार दिला. या स्पँडलमुळे भाजपची तर बोलतीच बंद झाली आहे.