महायुतीत तणातणी; नाशिकमध्ये मिंधे गटाच्या गोडसेंचा पत्ता भुजबळ कापणार

नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचे तिकीट जवळपास कापण्यात आले असून अजित पवार गटाचे छगन भुजबळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. पण शिंदे गट ही जागा सोडण्यास तयार नसल्याने महायुतीमध्ये प्रचंड ताणाताणी सुरु आहे.

अजित पवार गटाच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज दुपारी पत्रकार परिषद आयोजित केली. या पत्रकार परिषदेसाठी सुनील तटकरे हेलीकॉप्टरमधून रायगडमधून मुंबईत येणार होते. उमेदवारांच्या नावांची घोषणा करून परत हेलिकॉप्टरने रायगडला जाणार होते. पण महायुतीमध्ये जागा वाटपावरून ताणाताणी सुरु आहे. त्यामुळे उमेदवारांच्या नावावर एकमत होऊ शकले नाही. परिणामी आजची पत्रकार परिषद रद्द करण्याची वेळ आली

मिंध्यांची ताकद शून्य

नाशिकच्या सहा विधानसभा मतदारसंघापैकी देवळालीमध्ये अजित पवार गटाच्या सरोज अहिरे व सिन्नर विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे आमदार आहेत. तर नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात देवयानी फरांदे, पश्चिम विधानसभा मतदारसंघात सीमा हिरे व नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात अँड राहुल ढिकले हे तीन भाजपचे आमदार आहेत. तर इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे हिरामण खोसकर आमदार आहेत. शिंदे गटाचा या मतदारसंघात एकही आमदार नाही. या मतदारसंघा शिंदे यांची ताकदच नाही, असा युक्तीवाद करीत राष्ट्रवादीने नाशिक मतदारसंघासाठी छगन भुजबळांच्या नावाचा आग्रह धरला आहे. नाशिकमध्ये छगन भुजबळ यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे हेमंत गोडसे प्रचंड संतप्त झाले आहेत.

– नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस व शिंदे गटामध्ये प्रचंड रस्सीखेच सुरु आहे. या जागेसाठी हेमंत गोडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यांनी उमेदवारी देण्याचे संकेत देताच हेमंत गोडसे यांनी शक्तीप्रदर्शन करीत मिरवणूक काढली. मात्र दुसरीकडे अजित पवार गटाने या जागेसाठी भुजबळ यांचे नाव पुढे केले आहे.

– शिंदे गटाचा या मतदारसंघात एकही आमदार नाही. या मतदारसंघा शिंदे यांची ताकदच नाही, असा युक्तीवाद करीत राष्ट्रवादीने नाशिक मतदारसंघासाठी छगन भुजबळांच्या नावाचा आग्रह धरला आहे.

भावना गवळींच्या नावाला विरोध

यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी यांना पुन्हा उमेदवारी देण्याला भाजपचा विरोध आहे. यवतमाळची जागा शिंदे गटाला हवी असेल तर संजय राठोड यांना उमेदवारी द्या, असा प्रस्ताव भाजपने ठेवला आहे. दरम्यान, गवळी यांनी सोमवारी फडणवीसांची भेट घेतली.

पालघरच्या जागेवर भाजपचा दावा

पालघर लोकसभा हा भाजपचा परंपरागत मतदार संघ आहे. मागच्या निवडणुकीत मतदारसंघ सोडताना उमेदवारीही भाजपने दिला होता. पालघरची जागा परत द्या, अशी मागणी भाजपकडून केली जात आहे.