पवार घराण्यावर टीका करणे पडळकरांना महागात पडले

भाजपचे आमदार आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या मर्जीतील असलेले गोपीचंद पडळकर यांना पवार घराण्यावर टीका करणे महागात पडले आहे. याबाबत पडळकर यांच्याविरोधात असंतोष असून, आज सोलापुरात उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केले. यावेळी एका वराहचे ‘गोपीचंद’ असे नामकरण करून आपला संताप व्यक्त केला. यावेळी पडळकरांविरोधात तीव्र घोषणाबाजी करत सोलापुरात करेक्ट कार्यक्रम करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी बेताल वक्तव्य केल्याने त्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत आहेत. काँग्रेसमधील अजित पवार गटाच्या काही कार्यकर्त्यांनी आज सोलापुरातील भय्या चौकात पडळकरांविरोधात तीव्र घोषणबाजी करीत आंदोलन केले. यावेळी पकडून आणलेल्या एका वराहच्या गळ्यात गोपीचंद पडळकर यांची प्रतिमा अडकवून त्याचे नामकरण करण्यात आले. यावेळी पडळकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करताना कार्यकर्त्यांनी सोलापुरात पुन्हा पडळकरांचा करेक्ट कार्यक्रम होईल, असा इशारा दिला आहे. यापूर्वीही पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केल्याने सोलापुरात त्यांची गाडी फोडण्यात आली होती. याप्रकरणी दोघा कार्यकर्त्यांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. पडळकर यांनी आपल्या बेताल वक्तव्यावर नियंत्रण ठेवावे, अन्यथा ‘त्या’ घटनेची पुनरावृत्ती होईल, असा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला आहे.