अमेरिकेचा निम्मा विश्वचषक संघ हिंदुस्थानी; टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी अमेरिकेचा संघ जाहीर

येत्या 2 जूनपासून वेस्ट इंडीज व अमेरिका यांच्या संयुक्त यजमानीमध्ये आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या ‘रन’धुमाळीस प्रारंभ होणार आहे. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत 20 संघ सहभागी होणार आहेत. त्यात शनिवारी अमेरिकेच्या रूपाने दहावा विश्वचषक संघ जाहीर झाला. जाहीर झालेल्या या अमेरिकेच्या संघात निम्मे खेळाडू हे हिंदुस्थानी वंशाचे आहेत, हे विशेष.

मोनांक पटेल हा अमेरिकेच्या टी- 20 विश्वचषक संघाचा कर्णधार आहे. मोनांक हा हिंदुस्थानी असून, त्याचा जन्म गुजरातमधील आहे. मिलिंद कुमारने 2018-19च्या रणजी मोसमात सिक्कीम संघाचे प्रतिनिधित्व करताना 1331 धावा केल्या. शिवाय, आयपीएलमधील दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा भागही होता. मुंबईचा माजी डावखुरा फिरकीपटू हरमीत सिंगलाही संघात स्थान मिळाले आहे. मुंबईत जन्मलेल्या या खेळाडूने 2012 च्या 19 वर्षांखालील विश्वचषकात हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केले होते. 2013 मध्ये तो राजस्थान रॉयल्स आणि त्रिपुरासाठी क्रिकेट खेळलाय. हिंदुस्थानकडून 19 वर्षांखालील विश्वचषकात खेळलेला सौरभ नेत्रावळकरही अमेरिकेच्या संघात आहे. 2010च्या 19 वर्षांखालील विश्वचषकात तो हिंदुस्थानी संघाचा भाग होता. मात्र, हिंदुस्थानसाठी 19 वर्षांखालील विश्वचषक (2012) खेळलेले उन्मुक्त चंद आणि स्मित पटेल (यष्टीरक्षक) या खेळाडूंना अमेरिकेच्या टी-20 विश्वचषक संघात स्थान मिळविता आले नाही.

न्यूझीलंडचा कोरी अँडरसन अमेरिकेकडून टी-20 विश्वचषक खेळणार

यंदाच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी जाहीर झालेल्या अमेरिकेच्या संघात अष्टपैलू कोरी अँडरसनचा समावेश करण्यात आला आहे. अँडरसनने न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे. त्याने न्यूझीलंडसाठी एकदिवसीय आणि टी-20 विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धाही खेळल्या आहेत. 2015 मध्ये अंतिम सामना खेळलेल्या न्यूझीलंड संघाचा तो भाग होता. मात्र, काही काळापूर्वी त्याने न्यूझीलंड संघ सोडून अमेरिकेच्या संघात जाण्याचा निर्णय घेतला होता. आता तो टी-20 विश्वचषकात अमेरिकेकडून खेळताना दिसणार आहे.

टी-20 विश्वचषकासाठी अमेरिकेचा संघ –

मोनांक पटेल (कर्णधार/यष्टिरक्षक), अॅरोन जोन्स (उपकर्णधार), अॅण्ड्रिज गॉस, कोरी अँडरसन, अली खान, हरमीत सिंग, जेसी सिंग, मिलिंद कुमार, निसर्ग पटेल, नितीश कुमार, नोशतुश केंजिगे, सौरभ नेत्रावलकर, शेडली व्हॅन शाल्कविक, स्टीव्हन टेलर आणि शायन जहांगीर.

वीसपैकी दहा संघ जाहीर

यंदाच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत 20 देशांतील संघ कौशल्य पणाला लावणार आहेत. यातील दहा देशांनी आपले संघ जाहीर केले. जाहीर झालेल्या संघांत हिंदुस्थान, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इंग्लंड, नेपाळ, न्यूझीलंड, ओमान, दक्षिण आफ्रिका व अमेरिका या देशांचा समावेश आहे. अमेरिका हा टी-20 विश्वचषकासाठी संघ जाहीर करणारा दहावा देश ठरला. आता पाकिस्तान, बांगलादेश, नामिबिया, पापुआ न्यू गिनी, श्रीलंका, नेदरलँड, युगांडा, वेस्ट इंडिज, आयरलैंड, स्कॉटलंड या दहा देशांचे विश्वचषक संघ जाहीर होणे बाकी आहे.