फडणवीस-शिंदेंनी मराठा समाजाचा घात केला; मावळमध्ये मराठा समाजाचा संजोग वाघेरे-पाटील यांना जाहीर पाठिंबा

महायुती सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमचा घात केला आहे. त्याची खदखद मराठा समाजामध्ये असून धोका देणाऱ्यांचे उमेदवार आम्ही पाडू, असा इशारा सकल मराठा समाजाने मिंधे सरकारला दिला आहे. इतकेच नाही तर सलग दोन दिवस खोपोली येथे बैठक घेऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)- इंडिया आघाडीचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे गद्दारांच्या पायाखालील वाळू सरकली आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संपूर्ण राज्यात जबरदस्त आंदोलन करण्यात आले. मात्र या आंदोलनाकडे मिंध्यांचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पाठ फिरवली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या सकल मराठा समाजाने महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी पाठिंब्याचा ठरावदेखील करण्यात आला. त्याकरिता शुक्रवारी तसेच आज सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी खोपोलीत बैठक घेत बारणेंना धडा शिकवण्याचा निर्धार केला.

महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील, सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्य समन्वयक डॉ. सुनील पाटील, विनोद साबळे, रायगड जिल्हा समन्वयक शंकर थोरवे, गणेश कडू, उमेश म्हसे, प्रकाश पालकर, अनिल भोसले, मारुती पाटील, धनश्री दिवाने, किरण हाडप, उत्तम भोईर, जे.पी. पाटील, भानुदास पालकर, सुरेश बोराडे, नितीन मोरे, अविनाश तावडे, दीपक लाड, एकनाथ पिंगळे, राजन सुर्वे, अविनाश तावडे, मनोहर देशमुख यांच्यासह सकल मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बारणेंना समाजाबद्दल काहीच देणेघेणे नाही

मावळ मतदारसंघात 50 ते 60 टक्के मतदान मराठा समाजाचे आहे. मात्र विद्यमान खासदारांनी मराठा समाजाच्या आरक्षणावर ‘ब्र’ काढला नाही. त्यांना समाजाबद्दल काहीच देणेघेणे नाही. अनेकदा आंदोलने, उपोषणे झाली, पण ते एकदाही फिरकले नाहीत अशी टीका विनोद साबळे यांनी नाव न घेता बारणे यांच्यावर केली. संजोग वाघेरे-पाटील आरक्षणाच्या लढ्याला बळ देतील असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला.

विश्वासाला तडा जाऊ देणार नाही

मी इतरांप्रमाणे रंग बदलणार नाही. मला केव्हाही आदेश द्या, आपल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. मराठा आरक्षणासाठी प्रामाणिकपणे आवाज उठवेन हा माझा शब्द आहे, अशी प्रतिक्रिया संजोग वाघेरे-पाटील यांनी दिली.