यूपीच्या महिलेला लागला महागड्या मोबाईल चोरीचा छंद, सापळा रचत पुणे पोलिसांनी केलं जेरबंद

पुणे शहर परिसरात विशेषतः रेल्वे स्टेशन, बसस्टॅण्ड अशा गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोर्‍या करणार्‍या महिलेला समर्थ पोलिसांच्या पथकाने अटक केली. महिला मूळची उत्तरप्रदेशातील असून तिच्याकडून चोरीचे 12 महागडे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. तिच्याकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर समर्थ पोलिसांचे पथक हद्दीत गस्तीवर होते. सहायक निरीक्षक प्रसाद लोणारे, उपनिरीक्षक मिरा त्र्यंबके, पोलीस नाईक रूपाली काळे यांचे पथक पेट्रोलिंग करत असतानाच एक संशयीत महिला आपल्या सहा महिन्याच्या बाळाला कडेवर घेत गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोर्‍या करत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक त्र्यंबके यांना मिळाली. यानुसार पथकाने सापळा रचून महिलेला ताब्यात घेतले.

तपासणीत तिच्याकडे विविध कंपन्यांचे 12 मोबाईल आढळून आले. तिच्याकडे केलेल्या चौकशीत हे मोबाईल तिने रेल्वे प्रवास आणि शहरातील गर्दीच्या ठिकाणी चोरल्याचे कबूल केले. सदरची महिला ही मूळची उत्तरप्रदेशातील असून दिल्ली येथे वास्तव्य करते. दिल्लीवरून रेल्वे प्रवास करताना महिला मोबाईल चोर्‍या करायची. समर्थ पोलिसांच्या पथकाने तिला शहरातून ताब्यात घेत 1 लाख 40 हजार रुपये किंमतीचे 12 मोबाईल जप्त केले आहेत.

पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल, समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली, हेमंत पेरणे, रहीम शेख, कल्याण बोरडे, दत्तात्रय भोसले यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

महिला अशी करायची चोरी

महिलेला सहा महिन्याचे बाळ असून तिला कडेवर घेत ती शहरातील गर्दीच्या ठिकाणी वावरायची. कुणाला शंका येवू नये, यासाठी लहान बाळाचा सहारा घेत गर्दीच्या ठिकाणी महिलेच्या पाठीमागे उभा राहून पर्समधील मोबाईल चोरणे, रेल्वे प्रवासात मोबाईल चोरी केल्याचे समोर आले आहे. याप्रकारात तिचे आणखी काही साथीदार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.