परप्रांतीय कामगार चालवताहेत पिस्तुल विक्रीचे रॅकेट

पुणे जिह्याच्या ग्रामीण भागात बेकायदेशीररीत्या पिस्तूल बाळगणाऱयांविरुद्ध ग्रामीण पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली असून, आतापर्यंत अनेक पिस्तुले, काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिह्याच्या ग्रामीण भागातील परप्रांतीय कामगारांकडून ही पिस्तुले पुण्यात विक्रीसाठी येत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

रांजणगाव गणपती-रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये बेकायदेशीररीत्या पिस्तूल बाळगणाऱया सुशांत कराळे (रा. बाभूळसर खुर्द, ता. शिरूर) याला पोलिसांनी जेरबंद केले. एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील औद्योगिक वसाहतीमध्ये मोठय़ा प्रमाणावर परप्रांतीय कामगारवर्ग असल्याने त्यांच्या मदतीने परराज्यातून अवैधरीत्या पिस्तुले मागविली जातात. चार महिन्यांपूर्वी आठ पिस्तुले, पाच जिवंत काडतुसे व आठ सिनेस्टाइल लोखंडी कोयते जवळ बाळगणाऱया आरोपींना पोलिसांनी अटक केली होती.

पुणे, पिंपरी-चिंचवड, विविध उपनगरांबरोबरच जिह्याच्या ग्रामीण भागात मोठमोठय़ा आलिशान सोसायटय़ा उभ्या राहिल्या. हा धडाका अद्यापि सुरूच आहे. या बांधकामांसाठी स्थानिक मजूर कमी पडत असल्यामुळे परराज्यांतून, विशेषतः आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहारमधून मजुरांचे लोंढे पिंपरी-चिंचवड आणि जिह्याच्या ग्रामीण भागात दाखल झाले. नोकरी, व्यवसाय, रोजगाराच्या शोधात रोज परप्रांतीयांच्या लोंढय़ांची यामध्ये भर पडते. मोकळ्या जागांवर झोपडय़ा उभारून किंवा रस्त्यांच्या कडेला ते ठाण मांडतात. अनेक छोटय़ा-मोठय़ा गुह्यांमध्ये या परप्रांतीयांचा सहभाग असल्याचे यापूर्वी उघडकीस आले.

पूर्वी चाकू, कोयत्याचा धाक दाखवून होणाऱया या गुह्यात आता देशी-विदेशी पिस्तुलांचा सर्रास वापर सुरू आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागात हे प्रमाण जास्त आहे. परप्रांतातून आलेले हे मजूर वर्षातून दोन-तीन वेळा गावी जातात. कट्टे तयार करणारे कारागीर परदेशी बनावटीचे रिव्हॉल्वरही बेमालूमपणे तयार करतात. गावाहून परतताना काही मजूर हे गावठी कट्टे लपवून पुण्यात आणतात. पुण्यात त्यांची विक्री करीत असल्याचे यापूर्वी तपासात आढळले आहे. सध्या उपलब्ध असलेल्या मनुष्यबळाच्या जोरावर गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. कोम्बिंग ऑपरेशन, तडीपार गुंडांसाठी विशेष ऍप आणि अन्य उपाययोजना पोलीस सातत्याने राबवीत आहेत.

पुणे ग्रामीण पोलिसांनी या टोळ्यांविरुद्ध धडक मोहीम हाती घेतली आहे. गेल्या वर्षभरात शेकडो पिस्तुले, जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. अनेक टोळय़ांवर संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत कारवाई केली असून, अनेक गुन्हेगारांना स्थानबद्ध करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली.

मध्य प्रदेशच्या बॉर्डरवरून ही पिस्तुले आणली असून, यामागे मोठय़ा रॅकेटची शक्यता आहे. हे रॅकेट लवकरच उद्ध्वस्त करण्यात येईल. – पंकज देशमुख , ग्रामीण पोलीस अधीक्षक पुणे जिल्हा