धक्कादायक! कुठे नेऊन ठेवलाय आपला महाराष्ट्र!! पोलीसच झालेत ड्रग्जचे रखवालदार; पिंपरी-चिंचवडच्या पीएसआयला अटक

‘विद्येचे माहेरघर’ अशी ओळख असलेल्या पुण्यात वारंवार अमली पदार्थ, तस्करी, कोटय़वधीचे ड्रग्ज पकडल्याचे प्रकार घडत असताना आता पिंपरी-चिंचवड शहरात नुकत्याच पकडलेल्या मेफेड्रोन ड्रग्ज गुन्ह्यात चक्क पिंपरीच्या ‘पीएसआय’ला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात निगडी पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱया विकास शेळके याला सांगवी पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत. या धक्कादायक प्रकारामुळे पुणे आता ‘नशेचे माहेरघर’ बनतेय की काय, अशी भयंकर स्थिती निर्माण झाली असून देवेंद्र फडणवीस यांच्या गृहखात्याचे पोलीसच ड्रग्जचे रखवालदार झाले आहेत का, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

पुण्यात कोटय़वधीचे ड्रग्ज पोलिसांकडून पकडले जात असतानाही वारंवार अमली पदार्थ, ड्रग्जची तस्करी होत आहे. विशेष म्हणजे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलिसांनी नुकताच मोठा अमली पदार्थ जप्त केल्याच्या कारवाईची दखल घेत तब्बल 25 लाखांचे बक्षीसही जाहीर केले आहे. असे असताना मेफेड्रोनसारख्या घातक ड्रग्जच्या तस्करीत खुद्द पोलीस उपनिरीक्षक सहभागी असल्याचा प्रकार समोर आल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली असून आता पोलिसांचाच गुह्यात सहभाग आढळू लागल्याने नागरिक आणि समाजाचे संरक्षण कोण करणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

असे आहे प्रकरण

सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रक्षक चौक या ठिकाणी अज्ञात व्यक्तीकडून दोन कोटी दोन लाख रुपयांचे 2 किलो 38 ग्रॅम मेफेड्रोन ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. या प्रकरणात नमामी झा याला अटकही करण्यात आली होती. या गंभीर गुह्याच्या मुळापर्यंत जाण्यासाठी पोलिसांनी सखोल तपास केला असता पोलीस उपनिरीक्षक विकास शेळके याचे नाव समोर आले. शेळके याच्यासह एका हॉटेल कामगारालाही या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

45 किलोचा साठा

अमली पदार्थविरोधी पथक आणि सांगवी पोलिसांनी केलेल्या कारवाईत 2 किलो 38 ग्रॅम मेफेड्रोनसह आणखी 43 किलो एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. शुक्रवारच्या कारवाईत दोन किलो आणि आजच्या कारवाईत 43 किलो असे एकूण 45 किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. या ड्रग्जची पिंमत तब्बल 45 कोटी रुपये इतकी आहे.

आरोपीला पाच दिवसांची कोठडी

पुणे पोलिसांनी गेल्या काही दिवसांत पुणे, सांगली आणि दिल्लीतून तब्बल 4 हजार कोटींचे ड्रग्ज जप्त केले आहे. यानंतर पुणे पोलिसांनी विविध भागांत पेट्रोलिंग सुरू केले आहे. दरम्यान, आरोपी फौजदाराला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

रस्त्यात पडलेले ड्रग्जचे पोतेच लांबवले

26 फेब्रुवारीला एका गाडीतून मेफेड्रॉन असलेले पोते रस्त्यावर पडले. त्यावेळी एका कारचालकाने हे पोते उघडून पाहिल्यानंतर काळसर रंगाचा पदार्थ आढळला. त्याने नाकाबंदीवरील पोलीस अंमलदार सुधीर ढवळे आणि अनिल चव्हाण यांच्याकडे पोते दिले. यांतील ढवळे हा शेळके याचा रायटर होता. त्याने याबाबत शेळके याला माहिती दिली. शेळकेने पोते लपवून ठेवण्याचा सल्ला देत याबाबत वाच्यता न करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार ढवळे आणि चव्हाण यांनी पोते लपवून ठेवले.

अटक करण्यात आलेले पोलीस उपनिरीक्षक विकास शेळके यांचा नाकाबंदीत पकडलेले ड्रग्ज विकून पैसे कमवायचा डाव होता. विशालनगर परिसरात एक जण हे एमडी ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती सांगवी पोलीस ठाण्यातील अंमलदार विवेक गायकवाड यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून पहिला आरोपी नमामी शंकर झा याला दोन किलो एमडीसह ताब्यात घेतले होते.