ये रिश्ता क्या कहलाता है? शेअर्स गुंतवणुक प्रकरणावरून अदानी-मोदींवर राहुल गांधींचा निशाणा, JPC द्वारे चौकशीची मागणी

rahul-gandhi

गार्डियन वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या पंतप्रधान मोदी आणि उद्योगपती यांच्यातील संबंधावरून पुन्हा एकदा हिंडेनबर्गच्या अहवालाला बळकटी मिळाली असून देशाची प्रतिमा डागाळली जात आहे. यावरून गुंतवणूकदारांची फसवणूक आणि फसवणुकीतून आलेल्या पैशातून देशाच्या मालमत्ता खरेदी होत असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. यावेळी त्यांनी खरमरीत सवाल केले. तसेच त्यांनी मोदींनी अदानींच्या सोबतचे संबंध स्पष्ट करण्याची आणि संसदेच्या संयुक्त समितीकडून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली.

मुंबईत INDIA आघाडीच्या बैठकीसाठी आल्यानंतर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केलं. यावेळी बोलताना त्यांनी अत्यंत मुद्देसूद आणि स्पष्ट शब्दात मोदी आणि अदानींवर हल्लाबोल केला. देशात G20 चं वातावरण आहे. जगभरातून प्रतिनिधी हिंदुस्थानात येत आहेत. अशा वेळी जगभरात अर्थक्षेत्रातील अग्रेसर वृत्तपत्र म्हणून ओळखले जाणारे दोन वृत्तपत्र उद्योगपती अदानी आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. ‘मोदी लिंक्ड अदानी फॅमिली, सिक्रेटली इनव्हेस्टड इन ओन शेअर्स, डॉक्युमेंट सजेस्ट’ अशा मथळ्याखाली छापलेल्या वृत्तानं खळबळ उडवली असून देशाची प्रतिमा यातून खराब होत आहे. कारण एक परिवार जो मोदींच्या एकदम जवळचा आहे त्याने आपल्या कंपनीचे शेअर्स वाढवण्यासाठी स्वत:च्याच शेअरमध्ये गुंतवणूक केली, असं या वृत्तातून म्हटल्याचं राहुल गांधींनी सांगितलं.

1 बिलियन (100 कोटी) डॉलर्स हिंदुस्थानातून अदानींच्या नेटवर्कद्वारे वेगवेगळ्या देशांमध्ये गेले आणि परत अदानींच्याच कंपनीत आले. त्यातून शेअरच्या किंमती वाढवल्या आणि त्या पैशातून अदानी विमानतळं, बंदरे खरेदी करत आहेत. धारावीचा प्रोजेक्टही त्यांना देण्यात आला आहे. हिंदुस्थानची पुंजी ते खरेदी करत आहेत. हे प्रश्न वृत्तपत्रांनी उचलले आहेत. तसेच त्यांच्याकडे यासंदर्भात ई-मेलसारखे पुरावे आहेत, असं राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं.

हा पैसा नक्की कुणाचा आहे? अदानींचा आहे की अन्य कुणाचा आहे? आणि अन्य कुणाचा पैसा असेल तर तो कुणाचा आहे? असा पहिला प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला.

हे काम विनोद अदानी यांनी केलं आहे. जे गौतम अदानी यांचे भाऊ आहेत. पण त्यांच्या सोबत आणखी दोन पार्टनर आहेत. एकाचं नाव नासिर अली शबान अली आहेत आणि दुसरे चँग चुंग लिन हे चिनी आहेत. तर मग अदानी हिंदुस्थानचं इन्फ्रास्टक्चर खरेदी करताना चिनी नागरिक यात कसा सहभागी आहे? त्याची भूमिका काय आहे? त्यानं काय केलं? हे स्पष्ट झालं आहे. विदेशी गुंतवणूकदार हे हिंदुस्थानच्या बाजाराला कसे काय मॅन्युप्युलेट करत आहेत? असा दुसरा प्रश्न असल्याचं राहुल गांधी म्हणाले. हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे, अदानी हे देशाच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काम करतात, मग चिनी नागरिकाची भूमिका काय हे स्पष्ट झालंच पाहिजे, असं ते म्हणाले.

तसेच, सेबीनं अदानींना क्लिन चिट दिली. त्यात ज्यानं तपास केला आणि क्लिन चिट दिली आज ती व्यक्ती अदानींनी खरेदी केलेल्या एनडीटीव्हीचा संचालक आहे. म्हणजे हा थेट संस्था बळकावण्याचा प्रकार आहे. सेबीचा अध्यक्ष क्लिन चिट देतो आणि त्यानंतर लगेचच अदानींच्या कंपनीत संचालक बनतो. हे आंतरराष्ट्रीय प्रकरण आहे. मग यावर पंतप्रधान शांत का आहेत? हा प्रश्न असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

जागतिक वृत्तपत्र म्हणताहेत की अदानींचा आणि मोदींचा संबंध आहे. तर प्रश्न आहे की कोणता संबंध आहे? असा खणखणीत सवाल राहुल यांनी केला. केंद्रीय तपास यंत्रणा अदानींचा तपास का नाही करत? असे प्रश्न उपस्थित करत त्यांनी मोदींना लक्ष्य केलं. जगात आपली प्रतिमा आपण स्वच्छ, भ्रष्टाचार मुक्त असल्याची सांगत आहोत, असे असताना अशी वृत्त पुराव्यांसह प्रसिद्ध होत आहेत, यामुळे देशाची प्रतिमा खराब होत असून या प्रकरणाची संसदेच्या संयुक्त समितीकडून (JPC) कडून चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.