अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेऊन राहुल अमेठी, तर प्रियांका रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी 19 एप्रिल रोजी मतदान पार पडले. दुसऱ्या टप्प्यासाठी शुक्रवारी 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. दोन टप्पे होत आले तरी अद्याप काँग्रेसने अमेठी आणि रायबरेलीतील उमेदवारांची घोषणा केलेली नाही. काँग्रेसने या दोन्ही जागांबाबत सस्पेन्स कायम ठेवला आहे. मात्र हा सस्पेन्स आता संपण्याची शक्यता असून राहुल गांधी यांना अमेठी, तर प्रियांका गांधी यांना रायबरेली मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी काँग्रेसने सुरु केली आहे.

अमेठी आणि रायबरेली मतदारसंघात 26 एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल.  काँग्रेस नेते राहुल गांधी अमेठी, तर प्रियांका गांधी रायबरेली मतदार संघातून लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. अर्थात काँग्रेसकडून याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही, मात्र काँग्रेस हायकमांडला राहुल गांधी यांचे मन वळवण्यास यश आल्याचे वृत्त आहे.

यासाठी काँग्रेसनेही तयारी सुरू केली असून राहुल गांधी यांची टीमही अमेठीमध्ये शड्डू ठोकून आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर राहुल गांधी अमेठीला पोहोचण्याची शक्यता असून 1 मे रोजी ते उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात, अशी माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी राहुल आणि प्रियांका अयोध्येमध्ये रामलल्लाचे दर्शनही घेणार असल्याचे वृत्त आहे.

अमेठी मतदारसंघ काँग्रेसचा गड मानला जातो. 1967मध्ये अस्तित्वात आलेल्या या मतदारसंघात 13 वेळा काँग्रेसने, तर 2 वेळा भाजपने विजय मिळवला आहे. भाजपने 1998 आणि 2019मध्ये येथून विजय मिळवला. 2004 ते 2014 पर्यंत राहुल गांधी यांनी सलग तीन वेळा इथून निवडणूक जिंकली. मात्र गेल्या निवडणुकीत भाजपच्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा 55120 मतांनी पराभव केला होता.

राहुल गांधी 2019ची लोकसभा निवडणूक अमेठी आणि केरळच्या वायनाड मतदारसंघातून लढले होते. यंदाही ते वायनाडमधून लढणार आहेत. मात्र आता ते अमेठीतूनही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. अमेठीमध्ये राहुल गांधी यांचे पोस्टरही लागले असून यामुळे शक्यतांना बळ मिळत आहे.