गरीब महिला आणि सुशिक्षित बेरोजगारांना राहुल गांधी म्हणाले, प्रत्येकाच्या खात्यात 1 लाख रुपये ठकाठक… ठकाठक… ठकाठक… टाकणार

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने 22 अब्जाधीश तयार केले आहेत, तर आम्ही सत्तेत आल्यास कोटय़वधी, लखपती तयार करणार आहोत. महिलांच्या खात्यात दरमहा 8500 रुपये म्हणजेच एका वर्षात एक लाख रुपये, असे ठकाठक ठकाठक पैसे खात्यात जमा केले जातील. यातून कोटय़वधी, लखपती तयार होतील, असा दावा कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला.

मोदी सरकारने देशातील ठरावीक उद्योगपतींचे 16 लाख कोटींचे कर्ज माफ केले आहे. मात्र गरीब शेतकऱयांचे कर्ज माफ केले नाही, असे सांगत राहुल गांधींनी अमरावती येथील सभेतून पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधला. तसेच आपल्या सभेतून महिला, युवक आणि शेतकऱयांसाठी राहुल गांधींनी महत्त्वाच्या घोषणाही केल्या. मोदींनी देशातील युवकांना दोन कोटी नोकरीचे आमिष दाखवले, पण दिले काहीच नाही. त्यामुळे गरीबांची मुले नोकरीच्या शोधात भटकत आहेत. जी सुविधा देशातील श्रीमंत लोक त्यांच्या मुलांना देतात, तीच सुविधा आम्ही देशातील गरीबांच्या मुलांना आणि युवकांना देणार आहोत, असे राहुल गांधी म्हणाले.

पदवीधरांना वर्षाला एक लाख रुपयांची गॅरंटी

देशातील सर्वच पदवीधरांना अप्रेंटिशिप देऊन एक वर्षाची नोकरी गॅरंटी स्वरूपात दिली जाणार आहे. खासगी, सरकारी, सार्वजनिक क्षेत्रात ही नोकरी दिली जाईल. या नोकरीच्या माध्यमातून वर्षाला एक लाख रुपये त्यांच्या खात्यात जमा होतील.

जातनिहाय जनगणना करणार

काँग्रेस पक्ष जातनिहाय जनगणना करणार व सामाजिक, आर्थिक सर्व्हे करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेईल, असेही राहुल गांधी यांनी सांगितले.

संविधान आणि लोकशाही संपवू देणार नाही

लोकसभेची ही निवडणूक लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका राजकीय पक्षाने संविधानावर आक्रमण करून ते संपवण्याचे काम केले जात आहे. भाजप, नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मात्र संविधान व लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे त्यांचे लक्ष्य आहे. पण काँग्रेस आणि इंडिया आघाडी ते कोणालाही बदलू देणार नाही, असा खणखणीत इशारा काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी दिला आहे.

शेतकरी कर्ज माफीसाठी आयोग

नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षांत शेतकऱयांचे कर्ज माफ केले नाही, परंतु इंडिया आघाडीचे सरकार येताच शेतकऱयांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. यासाठी एक आयोग स्थापन केला जाणार असून या आयोगाने शिफारस केली की, शेतकऱयांची कर्जमाफी केली जाईल, एकदा नाही तर अनेकदा कर्जमाफी केली जाईल, असे राहुल गांधी म्हणाले.

मोदींनी 22 अरबपतींचे 16 लाख कोटी माफ केले

नरेंद्र मोदींनी देशातील 22 अरबपतींचे 16 लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. नोटाबंदी करून काळा पैसा बाहेर करण्याचे आश्वासन दिले, पण याचा फायदाही मोदींच्या मित्रांनाच झाला. जीएसटीचे पैसे जनतेकडून वसूल करून मूठभर उद्योगपतींच्या खिशात घातले. नरेंद्र मोदी हे अरबपतींचे नेते आहेत, गरीबांचे नेते नाहीत. इलेक्टोरल बाँडमधील भ्रष्टाचार पकडला गेल्याने मोदींची चिंता आणखी वाढली आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

अंगणवाडी महिलांचे पगार दुप्पट

अंगणवाडीच्या महिलांना दुप्पट पगार दिला जाईल. तसेच केंद्र सरकार आणि सार्वजनिक क्षेत्रात महिलांना आरक्षण दिले जाईल, अशी घोषणा राहुल गांधी यांनी केली.