मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनसवर 20 रुपयांत जेवण

लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर आहे. मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनसवर अवघ्या 20 रुपयांत रेल्वे प्रवाशांना जेवण मिळणार असून पश्चिम रेल्वेने यासाठी ‘आयआरसीटीसी’सोबत करार केला आहे.

उन्हाळय़ाच्या सुट्टीत अनेकजण सहकुटुंब फिरायला जातात. प्रवासासाठी अनेकांची पहिली पसंती रेल्वेला असते. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाडय़ा पकडण्यासाठी रेल्वे टर्मिनसवर सध्या मोठी गर्दी दिसते. या काळात रेल्वे प्रवाशांना स्वस्तात मस्त जेवण उपलब्ध करून देण्यासाठी पश्चिम रेल्वेने शंभरहून अधिक स्थानकांवर आतापर्यंत 150 फूड काऊंटर उभारले आहेत. हळूहळू या सेवेचा विस्तार केला जाणार आहे. विशेष म्हणजे, द्वितीय श्रेणीच्या जनरल डब्यांजवळ हे काऊंटर आहेत.

 असा आहे मेन्यू…  

प्रवाशांना 20 रुपयांत पुरी आणि भाजी तर 50 रुपयांत कॉम्बो जेवण म्हणजेच खिचडी, राजमा, छोले मिळणार आहे. याशिवाय 200 मिलीची पाण्याची बाटली अवघ्या तीन रुपयांत मिळेल.