पुण्यासह राज्यात पावसाचा अंदाज

राज्यात दडी मारलेल्या पावसाचे गणेशोत्सवकाळात पुन्हा आगमन होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दोन ते तीन दिवस पावसाने दमदार हजेरी लावली होती. सध्या आग्नेय राजस्थान आणि परिसरावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र निवळून गेले आहे. दरम्यान, पूर्व- मध्य आणि ईशान्य बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे वाहत आहेत. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे वायव्य बंगालच्या उपसागरात बुधवारपर्यंत (दि. २०) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र झाले, तर राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. सध्याच्या घडीला हे कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकल्यामुळे पुण्यासह राज्यातील विविध भागांमध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे.

पुणे शहरासह जिल्ह्यात हलका पाऊस पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये पुढील चार दिवस हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दोन दिवस झालेल्या तुफान पावसामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या पुणेकरांना दिलासा मिळाला होता. मात्र, त्यानंतर पावसाने पुन्हा विश्रांती घेतली आहे.

पुढील चार दिवस सरी

कोकणामध्ये २० ते २४ सप्टेंबर या कालावधीत बहुतांशी ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भामध्ये २० ते २४ सप्टेंबर या कालावधीत काही ठिकाणी पावसाची शक्यता असून, तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.