मोबाईलची आमिष दाखवून सरकारी कर्मचाऱ्याचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

मोबाईल फोनचं आमिष दाखवून एका सरकारी कर्मचाऱ्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना राजस्थानमध्ये घडली आहे. या प्रकाराची माहिती कळताच स्थानिकांनी या आरोपीची धुलाई केल्याचीही माहिती मिळत आहे.

राजस्थानच्या सरकारी विभागात आरोपी कॅशिअर म्हणून काम करतो. सुनील जांगिर असं या आरोपीचं नाव आहे. करौली येथील सरकारी कार्यालयात काम करणाऱ्या सुनीलने पीडितेला राज्य सरकारच्या एका मोफत योजनेबाबत माहिती दिली. त्या योजनेअंतर्गत तिला एक मोफत स्मार्टफोनही दिला जाईल, असं त्याने सांगितलं. त्याच्या बनावाला बळी पडल्याचं पाहताच सुनील पीडितेला मित्राच्या घरी घेऊन गेला.

तिथे त्याने तिला चाकू दाखवत धमकावलं आणि तिच्यावर बलात्कार केला. बलात्कारानंतर त्याने तिला एका निर्जन ठिकाणी सोडलं. पण, तिथे काही जण उपस्थित होते. पीडितेने आपल्यावरील प्रसंगाबाबत त्यांना सांगितल्याने स्थानिकांनी त्याला पकडलं आणि एका खांबाला बांधून त्यांनी सुनीलची धुलाई केली. त्याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. या सगळ्यात पोलिसांना न कळवल्यामुळे सुनील तिथून फरार झाला. त्याचा शोध सुरू असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.