Rameshwaram Cafe Blast Case: एनआयएची मोठी कारवाई, मास्टरमाईंडसह एकाला अटक

रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणात केंद्रीय तपास संस्थेने (NIA) शुक्रवारी मोठी कारवाई केली आहे. रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणात फरार मास्टरमाईंडसह एकाला पश्चिम बंगालमध्ये कोलकाताजवळ अटक केली आहे. 1 मार्चला बंगळूरूतील या कॅफेमध्ये झालेल्या स्फोटात 9 जण जखमी झाले होते. अटक केलेल्या दोघांची नावे मुसाविर हुसैन शाजिब आणि अब्दुल मदीन ताहा अशी आहेत.

एनआयएने या प्रकरणी माहिती दिली आहे. रामेश्वरम कॅफेत झालेल्या स्फोट प्रकरणात फरार झालेला मुसाविर हुसैन शाजिब आणि अब्दुल मदीन ताहा हे कोलकाता येथे लपून बसल्याची माहिती मिळाली होती. एनआयएचे पथक तिथपर्यंत पोहोचले. 12 एप्रिलच्या सकाळी कोलकाताजवळ फरार आरोपीच्या ठिकाणाचा पत्ता लावण्यात एनआयएला यश आले. तिथे ते खरी ओळख लपवून राहत होते, असे एनआयएने सांगितले.

मागच्या महिन्यात एनआयएने 30 वर्षीय ताहा आणि शाजिब यांच्या फोटोसोबत त्यांची माहितीही शेअर केली होती. शिवाय या दहशतवाद्यांवर 10 लाखांचे बक्षिसही जाहीर केले होते. शाजिब या दहशतवाद्याने कॅफेत आयईडी ठेवला होता आणि ताहा या स्फोटातील मास्टरमाईंड होता. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी केंद्रीय गुप्तचर संस्थांनी आणि पश्चिम बंगाल, तेलंगणा, कर्नाटक आणि केरळच्या राज्याच्या पोलिसांनी मदत केली. या प्रकरणात एनआयएने 300 हून अधिक सीसीटिव्ही फूटेज तपासले.

एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, याप्रकरणात आणखी दोन आरोपी असल्याचे सांगितले आहे. त्यापैकी एक मुनीर अहमद (26) त्यावेळी तुरुंगात होता. तर दुसरा आरोपी मुजम्मिल शरीफ (30) याला एनआयएने 27 मार्च रोजी सेल फोन, बनावट सिम कार्ड आणि स्फोटाची योजना बनवण्याच्या आरोपाखाली अटक केली होती.