वकील महिलेवर बलात्काराचा प्रयत्न

दक्षिण मुंबईतील शॉपिंग सेंटरमध्ये महिलांच्या प्रसाधनगृहात घुसून वॉचमनने 35 वर्षीय वकील महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही तर गळा दाबून मारण्याचाही प्रयत्न केला. पण महिलेने प्रसंगावधान राखत जबरदस्त प्रतिकार करून आपली सुटका करून घेतली. आझाद मैदान पोलिसांनी आरोपीला बेडय़ा ठोकल्या आहेत. रमाशंकर गौतम ऊर्फ संदीप पांडे (21) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो शेजारच्या इमारतीत सुरक्षा रक्षकाचे काम करत होता. महिला वकील गुरुवारी पर्ह्टमध्ये शॉपिंग सेंटरमधील महिला प्रसाधनगृहात गेल्या होत्या. त्या वेळी एक व्यक्ती आधीच महिला प्रसाधनगृहात उपस्थित होता. त्यामुळे त्यांनी त्याला हटकले व महिला प्रसाधनगृहात काय करतोस, अशी विचारणा केली. तेव्हा तो पळून गेला. त्यानंतर पीडित महिला प्रसाधनगृहात गेली व तेथून बाहेर पडत असताना तो पुन्हा तेथे आला व त्याने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.