विनामोबदला केबीन रंगवून घेतले, भूमी अभिलेखचा उपअधीक्षक अॅण्टी करप्शनच्या जाळ्यात

वडिलोपार्जित जमीनीची शासकीय मोजणी लवकरात लवकर करून देण्यासाठी तक्रारदाराकडून भूमी अभिलेख कार्यालय राजापूरचे उपअधीक्षक सुशील पवार यांनी त्यांच्या केबीनचे रंगकाम तक्रारदाराकडून विनामोबदला करुन घेतले. त्यामुळे आज लाच लुचपत प्रतिबंधक विभागा रत्नागिरीच्या पथकाने उपअधीक्षक सुशील पवार याला ताब्यात घेतले.

तक्रारदार यांना वडिलोपार्जित जमीनीची मोजणी करायची होती. शासकीय मोजणी लवकरात लवकर करुन देण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालय राजापूरचे उपअधीक्षक सुशील पवार यांनी मोजणी करण्याच्या बदल्यात त्यांच्या केबीनचे रंगकाम विनामोबदला करून देण्यास सांगितले. दि.8 आणि 10 मार्च रोजी तक्रारदाराने उपअधीक्षक सुशील पवार यांच्या केबीनचे रंगकाम करून दिले. त्यानंतर आज आरोपी उपअधीक्षक सुशील पवार याला पंचासमक्ष ताब्यांत घेण्यात आले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस निरिक्षक अनंत कांबळे, विशाल नलावडे, दीपक आंबेकर, हेमंत पवार आणि हुंबरे यांनी केली.