149 ठिकाणी दरडी कोसळणे, जमीन खचण्याचा धोका; मुंबईत 22 हजार कुटुंबांचा जीव टांगणीला

पावसाळा अगदी महिन्यावर आला असताना संपूर्ण मुंबईत तब्बल 149 ठिकाणी दरडी कोसळणे, जमीन खचण्याचा धोका असल्याचे समोर आले आहे. या 149 मधील केवळ सात ठिकाणे पालिकेच्या कार्यक्षेत्रात असून या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या असून रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. तर जिल्हाधिकारी हद्दीत असणाऱया 142 धोकादायक ठिकाणच्या रहिवाशांनी पावसाळय़ाआधी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, अशा नोटिसा पालिकेच्या वॉर्ड स्तरावरून पाठवण्यात येत आहेत. शिवाय संबंधित ठिकाणी जिल्हाधिकारी स्तरावर उपाययोजना करण्यासाठी पत्र दिल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली.

मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून  मुंबईत अतिवृष्टीत दरडी कोसळणारी ठिकाणे, जमीन खचण्याचा धोका असल्याच्या ठिकाणांचे सर्वेक्षण करून आवश्यक उपाययोजना करण्यासाठी संबंधितांना सूचना देण्यात येतात. 2017 मध्ये पालिकेच्या कार्यक्षेत्रातील एकूण 299 ठिकाणांचे शास्त्राrय पद्धतीने सर्वेक्षण करण्यात आले होते. यासाठी भारतीय भौगोलिक सर्वेक्षण विभागाची मदत घेण्यात आली होती. 2018 मध्ये भारतीय सर्वेक्षण विभागाने 299 पैकी 249 संभाव्य दरडी कोसळण्याच्या ठिकाणांचे सखोल सर्वेक्षण करून त्याचे चार उपप्रकारांत विभाजन केले. यामध्ये 46 ठिकाणे अतिधोकादायक असल्याचे जाहीरही करण्यात आले होते. यानुसार केलेल्या उपाययोजनांमुळे आता संपूर्ण मुंबईत 149 धोकादायक ठिकाणे शिल्लक आहेत. यातील फक्त सात ठिकाणे पालिकेच्या कार्यक्षेत्रात असून या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत.

…तर पालिका जबाबदार नाही

दरम्यान, पालिकेने मुंबईत 188 अतिधोकादायक इमारतींची यादीही   www.mcgm.gov.in या वेबसाईटवर जाहीर केली आहे. या ठिकाणच्या रहिवाशांनी पावसाळय़ाआधी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, अन्यथा दुर्दैवाने  कोणतीही दुर्घटना घडल्यास पालिका जबाबदार राहणार नाही, असा इशाराही पालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

प्रत्येक विभागात 5 ठिकाणी तात्पुरता निवारा

मुंबईत अतिवृष्टीत इमारत कोसळणे, दरड कोसळणे, जमीन खचणे अशा दुर्घटनांमध्ये रहिवाशांच्या राहण्याचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यांच्या सुविधेसाठी पालिकेकडून प्रत्येक वॉर्डमध्ये किमान पाच शाळांमध्ये तात्पुरता निवारा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था तैनात करण्यात येत आहे. या ठिकाणी आपत्तीग्रस्तांना राहण्याच्या सुविधेसह जेवण आणि शौचालय, वैद्यकीय सुविधाही पालिकेच्या माध्यमातून मोफत उपलब्ध करून देण्यात येतात, अशी माहितीही पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.