
राज्यातील शेतकरी कर्जमाफी योजनेवरून सध्या राजकीय वातावरण तापले असून या योजनेच्या अटी-शर्तींमुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या निर्णयातील जाचक अटी तातडीने काढून टाकाव्याचत, अन्यथा 12 जूनपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलनासाठी प्रशासनाने परवानगी द्यावी, अशी आक्रमक भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे चे आमदार रोहित पवार यांनी घेतली आहे.
सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत अनेक जाचक अटी घालण्यात आल्या आहेत. या अटींमुळे राज्यातील बहुतांश गरजू शेतकरी या लाभापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणतीही अट न ठेवता सरसकट कर्जमाफी मिळावी, ही आमची प्रमुख मागणी आहे, असे आमदार पवार यांनी स्पष्ट केले. या मागणीसाठी 12 जूनपासून पंढरपूर येथे शांततापूर्ण मार्गाने अन्नत्याग आंदोलन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, प्रशासनाकडून अद्याप या आंदोलनासाठी परवानगी देण्यात आलेली नाही.
राज्यशासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीतील जाचक अटीशर्तीमुळे बहुतांश शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. सरकारने टाकलेल्या जाचक अटी-शर्ती काढून अन्नदात्याला #विनाअट_सरसकट_कर्जमाफी मिळावी, यासाठी १२ तारखेपासून पंढरपूर येथे शांततेच्या मार्गाने करत असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 9, 2026
प्रशासनाच्या या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत एकतर शासनाने कर्जमाफीतील जाचक अटी त्वरित काढून टाकाव्यात किंवा आंदोलनाला परवानगी द्यावी, ही आमची स्पष्ट भूमिका आहे, असे रोहित पवार यांनी सांगितले. सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अन्नत्याग आंदोलन करण्याचे निश्चित केले होते. मात्र, जर प्रशासन त्या ठिकाणी परवानगी देण्यास नकार देत असेल, तर नाईलाजास्तव आम्हाला पंढरपूर येथील नामदेव पायरीजवळ हे अन्नत्याग आंदोलन सुरू करावे लागेल, असा इशाराही रोहित पवार यांनी दिला आहे.
































































