आले रे…! रोहित शर्मा, विराट कोहली टी-20 वर्ल्ड कपसाठी सज्ज, अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी संघात निवड

रोहित शर्मा आणि विराट कोहलीशिवाय हिंदुस्थानी टी-20 संघाला पर्याय नाही. त्यामुळे गेल्या दीड महिन्यापासून त्यांच्या आगामी टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळण्याबाबत सुरू असलेल्या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला असून ते दोघेही हिंदुस्थानी टी-20 संघात परतले आहेत. गेल्या 14 महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटपासून दूर असलेला रोहित शर्मा पुन्हा कर्णधार म्हणून परततोय तर त्याला विराट कोहलीचीही साथ असेल. येत्या 11 ते 17 जानेवारीदरम्यान तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी आज 16 सदस्यीय संघ जाहीर करताना बीसीसीआयने नव्या दमाच्या खेळाडूंचीच अधिक निवड करत आपले टी-20 वर्ल्ड कपचे प्रयोग सुरू केले आहेत.

गेल्या वर्षी वन डे वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात पराभवाचा धक्का बसल्यानंतर रोहित आणि विराटने आगामी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याबाबतच मौनच पाळले होते. पण रोहितचा वर्ल्ड कपमधला फॉर्म आणि हिंदुस्थानी संघातला सर्वात हिट आणि फिट खेळाडू विराट कोहलीने टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळावे म्हणून क्रिकेटविश्वातील साऱयाच दिग्गजांनी फिल्डिंग लावली होती. त्यांनी टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळावे आणि हिंदुस्थानला पुन्हा जगज्जेते बनवावे, अशी क्रिकेटपटूच नव्हे तर तमाम हिंदुस्थानींचीही मनापासून इच्छा आहे. त्यामुळे बीसीसीआयलाही आगामी वर्ल्ड कपसाठी संघात हे दोघे हवेच होते. त्यामुळे बीसीसीआयचा आग्रह, दिग्गजांनी लावलेली फिल्डिंग आणि मनधरणीमुळे या दोघांनीही टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळणार असल्याचे संकेत आधी दिलेच होते, मात्र आज बीसीसीआय आणि निवड समितीने त्याच्यावर शिक्कामोर्तब केले.

शिवम दुबेला संधी

गेल्या आयपीएल मोसमात केलेली दमदार फलंदाजी तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेतील कामगिरी. एवढेच नव्हे तर सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतील जोरदार फलंदाजीने मुंबईकर शिवम दुबेसाठी संघाचे दरवाजे पुन्हा उघडले आहेत. अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेतही हिंदुस्थान आपल्या युवा खेळाडूंची चाचपणी करणार दिग्गजांना विश्रांती देत  शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर यांची निवड करण्यात आली आहे. या मालिकेत कामगिरी त्यांना थेट वर्ल्ड कपचे तिकीटही देऊ शकते.

जितेश शर्मासह सॅमसनही संघात

जितेश शर्माला यष्टिरक्षक म्हणून संघात कायम ठेवताना संजू सॅमसनलाही संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकावेळी दोघेही संघात दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे इशान किशन आणि के. एल. राहुल या दोन्ही यष्टिरक्षक-फलंदाजांना विश्रांती देण्यात आली आहे.

हार्दिक पंडय़ा, सूर्यकुमार यादव बाहेरच

दुखापतीमुळे हार्दिक पंडय़ा अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार नसल्याचे आधीच स्पष्ट होते. तसेच सूर्यकुमार यादवबाबतही कोणताच धोका न पत्करता या दोघांऐवजी नव्या दमाच्या खेळाडूंनाच संधी देण्यात
आली आहे.

बुमरा, सिराजलाही विश्रांती

टी-20 वर्ल्ड कपमध्ये बुमरा आणि सिराजचे स्थान निश्चित मानले जात आहे. पण या दोघांना विश्रांती देत अर्शदीप सिंग, आवेश खान आणि मुकेश कुमार यांच्यावर हिंदुस्थानची वेगवान गोलंदाजी सोपविण्यात आली आहे. तसेच रवींद्र जाडेजा आणि श्रेयस अय्यर यांनाही बाहेर ठेवत तिलक वर्मा आणि रिंकू सिंहसारख्या खेळाडूंना आपला खेळ दाखवण्याची संधी देण्यात आली आहे.

हिंदुस्थानचा टी-20 संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैसवाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), संजू सॅमसन, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिष्णोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार.