रुईयात व्यावसायिक अभ्यासक्रमांची फीवाढ, विद्यार्थी हवालदिल; युवासेनेकडे तक्रार

माटुंगा येथील नामांकित रुईया महाविद्यालयाने मायक्रोबायोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या फीमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे विद्यार्थी हवालदिल झाले असून आर्थिकदृष्टय़ा दुर्बल विद्यार्थ्यांना ही वाढीव फी भरणे कठीण झाले आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडे या फीवाढीप्रकरणी काही विद्यार्थ्यांनी तक्रार केली होती. महाविद्यालयाने व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या फीमध्ये 15 हजारांनी वाढ केली. ही वाढीव फी एकत्रितपणे भरणे शक्य नाही. या फीवाढीमुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू शकतात, अशी भीती व्यक्त होत होती. या तक्रारीची दखल घेत युवासेना माजी व्यवस्थापन परिषद सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर यांच्यासह युवासेना पदाधिकारी अजय व्हनोळे, नीलेश बडदे आणि रितेश सावंत यांनी प्राचार्या डॉ. अनुश्री लोकुरे यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या व्यथा मांडल्या. तसेच सदर वाढीव फी कमी करून विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची मागणी केली.

फीअभावी विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही

फी न भरल्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द होणार नाही तसेच विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही, अशी ग्वाही या वेळी प्रा. लोकुरे यांनी युवासेनेच्या शिष्टमंडळाला दिली. मागील पाच वर्षांपासून महाविद्यालयाने कोणत्याही प्रकारची शुल्कवाढ केलेली नाही तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱयांना पगार देण्यासाठी फीवाढ अपरिहार्य असल्याचेही त्यांनी सांगितले. या अभ्यासक्रमांना सरकारकडून कोणत्याही प्रकारची आर्थिक सुविधा देण्यात येत नाही. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना एकरकमी फी भरणे शक्य नसेल त्यांनी त्यांच्या सोयीनुसार फी भरावी. तसेच ज्या गरीब विद्यार्थ्यांना फी भरणे अशक्य आहे त्यांनी आपल्या कागदपत्रांसह अर्ज करावेत. त्यावर सकारात्मक तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या निमित्ताने भारतीय कामगार सेनेच्यावतीने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील शिवछत्रपतींच्या पूर्णाकृती पुतळ्याला आणि टर्मिनल 2 येथील शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी प्राणांची आहुती देणाऱया 107 हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. त्याचबरोबर विमानतळ विभागातील कामगारांना लाडू वाटप करून कामगार दिन साजरा करण्यात आला. याचे आयोजन भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस संजय शंकर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी चिटणीस संतोष कदम, सूर्यकांत पाटील, योगेश आवळे, सहचिटणीस नीलेश ठाणगे, विनायक शिर्पे, कार्यकारिणी सदस्य, सर्व कमिटी सदस्य आणि मोठय़ा संख्येने कामगार उपस्थित होते