सामना अग्रलेख – देणाऱ्याचे हात घ्यावे

sharad-pawar-uddhav-thackeray

आमदार फुटले म्हणजे पक्ष फुटला असे होत नाही, असे निरीक्षण देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले. तरीही फुटिरांच्या हाती पक्ष चिन्ह सोपवणे हाच हुकूमशाही पद्धतीचा कारभार आहे. अशा निवडणूक आयोगासमोर शरद पवार यांना हुकूमशहा ठरवले जाते उद्धव ठाकरे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. ठाकरेपवार यांच्या कारभाराने अनेक दगडांना शेंदूर फासून त्यांना देवत्व दिले. पण मिंधेअजित पवार गटाने देणाऱ्याचे हातच घेतले देणाऱ्यांना हुकूमशहा ठरवून मोकळे झाले.

शरद पवार हे हुकूमशहा आहेत व त्यांनी घर चालवल्यासारखा पक्ष चालवला, असा युक्तिवाद अजित पवार गटाने निवडणूक आयोगासमोर केला. पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अजित पवार गटाने दावा सांगितला व निवडणूक आयोग अजित पवारांचा युक्तिवाद ऐकून घेत आहे. पक्षाचे संस्थापक शरद पवार हे निवडणूक आयोगासमोर प्रत्यक्ष हजर होते व अजित पवारांचे वकील ‘राष्ट्रवादी काँग्रेस आमचीच’ असे नरडे ताणून सांगत होते. निवडणूक आयोगासमोर शिवसेनेच्या संदर्भात हेच घडले. एकनाथ शिंदे व त्यांच्या मिंधे गटाने शिवसेनेवरच दावा सांगितला व निवडणूक आयोगाने तो मान्य केला. निवडणूक आयोगाची ही मनमानी आहे. एखाद्या पक्षातून काही आमदार किंवा खासदार फुटल्याने पक्ष त्यांच्या मालकीचा होत नाही. आज त्यांना पक्ष व चिन्ह दिले व हे सर्व आमदार-खासदार उद्या निवडणुकीत पराभूत झाले तर निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे तेथेच बारा वाजतील. शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी केली तशी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना शरद पवार यांनी केली. याच दोन्ही पक्षांनी शिंदे व अजित पवारांसारख्यांना पदे दिली. त्यामुळे मूळ पक्ष महत्त्वाचा. आता शरद पवार हे घर चालवल्याप्रमाणे पक्षाचा कारभार चालवतात असे अजित पवार म्हणतात. पक्ष घरातलाच असल्यामुळे अजित पवार चार-पाच वेळा उपमुख्यमंत्री होऊ शकले व श्री. शरद पवार यांचा वरदहस्त होता म्हणूनच ‘ईडी’ने अजित पवारांना तसा हात लावला नाही. एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी बेइमानी केली हे ठीक, पण त्यांनी मातृपक्षावरच दावा सांगितला ही लफंगेगिरी म्हणावी लागेल. स्वतःच्या नेतृत्वात इतकी क्षमता व कुवत होती तर त्यांनी स्वतःचे वेगळे पक्ष स्थापन करून लोकांचा कौल घ्यायला हवा, पण भारतीय जनता पक्ष हे त्यांचे नवे मालक असून मालकाच्या इशाऱ्यावर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा सांगितला जात आहे. शरद पवार हुकूमशहा आहेत, असा आरोप झाला आहे, पण

याच ‘हुकूमशहा’ने

तुरुंगातून सुटून आलेल्या छगन भुजबळांना मंत्री केले व तुरुंगाच्या वाटेवर असलेल्या हसन मुश्रीफ यांनाही राजवस्त्रे दिली. पवारांच्या कारभारातील ‘हुकूमशाही’ तेव्हा या लोकांना टोचली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे आमच्याबरोबर आहेत असा दावा अजित पवार करतात. उंदराला मांजर साक्ष असावी त्यातलाच हा प्रकार! प्रफुल्ल पटेल यांनाही पवारांनी भरभरून दिले. दिल्लीच्या राजकारणात पटेलांची पत पवारांमुळेच आहे. पटेल यांच्यावर ‘ईडी’ची कारवाई सुरू आहे व त्यांची संपत्ती ईडीच्या ताब्यात आहे. दाऊदचा हस्तक इक्बाल मिर्चीबरोबर पटेलांचे व्यवहार संशयास्पद आहेत. त्यामुळे कारवाई टाळण्यासाठी पटेलांनी पवारांना टांग मारली. असे हे पटेल आमच्याबरोबर आहेत अशी ‘टाळी’ अजित पवार गटाने मारावी हा विनोद आहे. पटेलांसारखे लोक तसे कोणाचेच नसतात. पक्ष सोडल्यावर पहिल्याच भाषणात पटेलांनी निर्लज्जपणे शरद पवारांवर तोंडसुख घेतले होते. शिंदे यांच्या मिंधे गटाप्रमाणेच अजित पवारांचा गट भाजपच्या टाचेखाली चिरडला गेला आहे. अजित पवार यांचा युक्तिवाद असा की, ‘‘एकच व्यक्ती पक्षावर अधिकार गाजवू शकत नाही.’’ अजित पवार सध्या ज्या भाजपच्या कच्छपी लागले आहेत तो पक्ष काय लोकशाही मार्गाने चालवला जात आहे? पक्षाचे अध्यक्ष ‘नड्डा’ हे नामधारीच असून नड्डा यांचा ‘नाडा’ मोदी-शहांच्या हाती आहे. अजित पवार व शिंदेदेखील त्याच नाडय़ात गुंतून पडले आहेत. अजित पवार यांनी तर आता त्यांच्या भाजपसोबतच्या सत्तासंगतीला 100 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जनतेच्या नावाने प्रसिद्ध केलेल्या पत्रात त्यांच्या पक्षद्रोहाला तथाकथित विचार आणि जनकल्याणाचा मुलामा दिला आहे. शब्दांची ही रंगसफेदी केवळ सत्तेसाठी तुम्ही केलेले पक्षद्रोहाचे पाप अजिबात झाकणार नाही. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ व उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची ‘शिवसेना’ हे

पक्ष स्थापन

झाले ते एका विचारसरणीतून. इथे एक बाब लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे, महाबळेश्वरच्या राज्यव्यापी शिबिरात उद्धव ठाकरे यांची कार्याध्यक्षपदी एकमताने निवड झाली तेव्हा शिंदे हे ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीबाहेर नव्हते. त्यामुळे शिवसेनेच्या जडणघडणीत त्यांचा सहभाग असण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. ते शिंदे निवडणूक आयोगास सांगतात की, ‘‘शिवसेना माझीच!’’ हा मानसिक गोंधळ आहे. ‘ठाकरे’ नसते तर शिंदे यांना कोणी ओळखले नसते व शरद पवार नसते तर अजित पवार बारामतीत सायकलवरून फिरताना दिसले असते! शिवसेना ठाकऱ्यांची हे पाकिस्तानातसुद्धा कोणीही सांगेल. तसा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचाच असे सांगितले जाईल, पण आपल्या निवडणूक आयोगास हे माहीत नसावे व उटपटांग पद्धतीने मूळ पक्ष बेइमानांच्या दावणीला बांधला जातो हा प्रकार धक्कादायक आहे. ‘पवार हे हुकूमशाही पद्धतीने कारभार करीत होते व उद्धव ठाकरे हे घरी बसून कारभार करीत होते,’ असे युक्तिवाद निवडणूक आयोगासमोर होतात, यास कोणताही घटनात्मक आधार नाही. आमदार फुटले म्हणजे पक्ष फुटला असे होत नाही, असे निरीक्षण देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले. तरीही फुटिरांच्या हाती पक्ष व चिन्ह सोपवणे हाच हुकूमशाही पद्धतीचा कारभार आहे. अशा निवडणूक आयोगासमोर शरद पवार यांना हुकूमशहा ठरवले जाते व उद्धव ठाकरे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. ठाकरे-पवार यांच्या कारभाराने अनेक दगडांना शेंदूर फासून त्यांना देवत्व दिले. विंदांच्या कवितेप्रमाणे सांगायचे तर-

देणाऱ्याने देत जावे

घेणाऱ्याने घेत जावे

घेता घेता एक दिवस

देणाऱ्याचे हात घ्यावे

मिंधे-अजित पवार गटाने देणाऱ्याचे हातच घेतले व देणाऱ्यांना हुकूमशहा ठरवून मोकळे झाले.