सामना अग्रलेख – अमृतानुभव हरवला!

हरिपाठ, संत साहित्य, शास्त्र, पुराणांबरोबरच सामाजिक व राजकीय विषयांची सुंदर गुंफण करीत श्रोत्यांना तासन्तास खिळवून ठेवणारे बाबा महाराज सातारकर आता वैकुंठात पोहोचले आहेत. तिथे आपल्या लाडक्या विठुमाऊलींसमोरही रसाळ वाणीतून ते कीर्तन करतीलच. पृथ्वीलोकातून हरवलेला प्रवचनांचा हा अमृतानुभव इथून पुढे स्वर्गलोकी नांदू लागेल. बाबा महाराजांच्या अमोघ वाणीतील या कीर्तन-प्रवचनांत तल्लीन होण्यासाठी साक्षात ज्ञानेश्वर माऊली, तुकोबाराय, संत नामदेव व चोखामेळा हे संतश्रेष्ठही आता आसुसले असतील!

आपल्या रसाळ वाणीतील प्रवचनांतून आणि ओघवत्या शैलीतील कीर्तनांमधून महाराष्ट्राला विठुरायाच्या भक्तिरसात डुंबवणारे वारकरी संप्रदायाचे ऋषितुल्य राजदूत बाबा महाराज सातारकर वैकुंठवासी झाले. जगाचा निरोप घेताना बाबा महाराजांचे वय नव्वदीच्या घरात होते. मात्र हरिभक्ती व विठुरायाच्या नामसंकीर्तनातून शेवटच्या श्वासापर्यंत बाबा महाराज आपल्या भक्तसंप्रदायाचेच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राचे समाजप्रबोधन करीत राहिले. छाछूगिरी, भोंदूगिरी व बुवाबाजीचे स्तोम समाजात माजले असतानाच बाबा महाराज मात्र त्यापासून कोसो दूर राहिले. उलट 15 लाखांहून अधिक व्यक्तींच्या गळय़ात वारकरी संप्रदायाची खूण असलेली तुळशीची माळ घालून त्यांना व्यसनमुक्त करणारे व भागवत धर्माची दीक्षा देणारे बाबा महाराज सातारकर वंदनीय ठरतात ते यामुळेच. स्वच्छ पांढरा सदरा, तसेच शुभ्र धोतर, डोक्यावरील भलामोठा पटकाही पांढराच आणि कपाळावर बुक्क्याचे गोल काळे वर्तुळ, खांद्यावर उपरणे आणि जिव्हेवर साक्षात सरस्वतीचा संचार, अशा प्रसन्न व अद्भुत व्यक्तिमत्त्वाचे धनी होते बाबा महाराज सातारकर! माणसामध्ये ईश्वर पाहणारा व या अखिल विश्वात कुणीही श्रेष्ठ वा कनिष्ठ नाही, या समतेच्या विचाराची आपल्या कीर्तनांतून आयुष्यभर पखरण करणारा हा सच्चा ईश्वरदूत होता. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव यांच्या रचनांचा आधार घेत व अत्यंत साधी-सोपी उदाहरणे देत आपल्या अमोघ वाणीतून बाबा महाराज जेव्हा कीर्तन वा प्रवचन सादर करीत तेव्हा त्यांना ऐकणे हा अमृतानुभवच असे. अशा थोर महात्म्याच्या निधनामुळे भागवत धर्माची, वारकरी संप्रदायाची,

महाराष्ट्राला लाभलेल्या

थोर कीर्तन परंपरेची असामान्य हानी झाली आहे. पंढरपूरचा विठ्ठल हेच त्यांचे सर्वस्व होते. संतश्रेष्ठ तुकोबाराया म्हणतात त्याप्रमाणे,

आगम निगमाचे स्थान,
विठ्ठल आमचा निजाचा,
सज्जन सोयरा जिवाचा
माय, बाप, चुलता, बंधू
अवघा तुजसी संबंधू!
समर्पिली काया, तुका म्हणे पंढरीराया!

या भूमिकेतून अवघे जीवन विठुचरणी समर्पित करणारे आधुनिक काळातील व्यासंगी संत वा सत्पुरुष म्हणावे असेच त्यांचे जीवन होते. आस्तिक असो वा नास्तिक, ईश्वरावर श्रद्धा असो वा नसो, अशा अश्रद्ध माणसांनाही खिळवून ठेवण्याचे व भक्तिरसात दंग करण्याचे अलौकिक सामर्थ्य बाबा महाराज सातारकरांकडे होते. वारकरी संप्रदायाचे सच्चे पाईक असलेल्या बाबा महाराजांनी आयुष्यभर कधीही बुवाबाजी, गंडे-दोरे वा दैवी चमत्कारांसारख्या पाखंडाला थारा दिला नाही. भगवी वस्त्र्ाs धारण करून, दाढी वाढवून, मंत्र-तंत्राचे तोडगे सांगून आपण कुणी तरी अंतर्यामी दैवी पुरुष वा ईश्वरी अंश असल्याचे भासवून गर्दी गोळा करणारी हल्लीची गल्लाभरू बुवाबाजी बाबा महाराजांना कधीही स्पर्श करू शकली नाही. आपला महिमा वाढवण्यापेक्षा वा आपली थोरवी सांगण्यापेक्षा वारकरी संप्रदायाचा व भागवत धर्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठीच त्यांनी आपले सारे आयुष्य वेचले. बाबा महाराजांच्या घरी शेकडो वर्षांपासूनची

वारकरी संप्रदायाची

परंपरा आहे. बाबांनीही शेवटच्या श्वासापर्यंत ही परंपरा प्राणपणाने जपली. 5-6 वर्षांपूर्वी एका मुलाखतीत बाबा महाराज म्हणाले, ‘माझे वय 83 आहे; पण माझी पंढरीची वारी मात्र 84 वी आहे. त्याचे कारण म्हणजे माझी एक वारी आईच्या पोटातच झाली आहे.’ बाबा महाराज अलीकडच्या काळात जेव्हा खूपच थकले व चालणेही अशक्य झाले, तेव्हादेखील ते वारीसोबत चार पावले का होईना, चालत व बाकी वारी गाडीतून अनुभवत. एखाद्या आईने आपल्या लेकराला गोड भाषेत एखादी गोष्ट समजावून सांगावी, त्याच पद्धतीने आपल्या प्रेमळ आवाजातून ते श्रोत्यांशी संवाद साधत. या विलक्षण हातोटीमुळेच बाबा महाराज सातारकर हे नाव महाराष्ट्रात सर्वतोमुखी झाले. महाराष्ट्रातच नव्हे तर ब्रिटन व अमेरिकेतही त्यांची प्रवचने, कीर्तने झाली. मराठीबरोबरच हिंदी, इंग्रजी भाषेतही त्यांनी अनेक प्रवचने दिली. कीर्तनात विनोद असावा, असे ते म्हणत; पण हल्ली विनोदांत हरवत चाललेले कीर्तन पाहून ते व्यथितही होत. हरिपाठ, संत साहित्य, शास्त्र्ा, पुराणांबरोबरच सामाजिक व राजकीय विषयांची सुंदर गुंफण करीत श्रोत्यांना तासन्तास खिळवून ठेवणारे बाबा महाराज सातारकर आता वैपुंठात पोहोचले आहेत. तिथे आपल्या लाडक्या विठुमाऊलींसमोरही रसाळ वाणीतून ते कीर्तन करतीलच. पृथ्वीलोकातून हरवलेला प्रवचनांचा हा अमृतानुभव इथून पुढे स्वर्गलोकी नांदू लागेल. बाबा महाराजांच्या अमोघ वाणीतील या कीर्तन-प्रवचनांत तल्लीन होण्यासाठी साक्षात ज्ञानेश्वर माऊली, तुकोबाराय, संत नामदेव व चोखामेळा हे संतश्रेष्ठही आता आसुसले असतील!