सामना अग्रलेख – बाबासाहेबांचे पुण्यस्मरण, संविधान बचाव!

आज देशात लोकशाहीच्या सर्व स्तंभांवर हल्ले सुरू आहेत. संविधानाची हवी तशी मोडतोड केली जात आहे. सत्तेच्या या दमनचक्राविरुद्ध देशाला लढा उभारावाच लागेल. त्यासाठी संघटित होऊन संघर्ष करा, या बाबासाहेबांच्या विचारांची कास देशाला धरावीच लागेल. देशातील लोकशाही व संविधान वाचवायचे असेल तर बाबासाहेबांचे ‘विधान’ हाच एकमेव तरणोपाय आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेबांचे हेच खऱया अर्थाने पुण्यस्मरण ठरेल. ‘संविधान बचाव’चा नारा देत इंडिया आघाडी याच संघटित संघर्षाच्या दिशेने एक-एक पाऊल पुढे टाकत आहे.

भारतात घटनेची रोज पायमल्ली होत आहे. संविधान वाचवा, राज्यघटना वाचवा यासाठी जागरणे सुरू आहेत. डॉ. आंबेडकरांनी निर्माण केलेल्या घटनेच्या छाताडावर उभे राहून काही लोक राज्य करू पाहत आहेत. भारताची राज्यघटना गीता, कुराण, बायबलपेक्षा पवित्र ग्रंथ. त्या ग्रंथाचे पावित्र्य नष्ट करणाऱया घटना रोज घडत आहेत. राष्ट्रपती, न्यायालये, संसद, राज्यपाल, निवडणूक आयोग अशा सर्व घटनात्मक संस्थांचे राजरोस अधःपतन सुरू आहे. अशा वेळी ‘घटनाकार’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे चिरंतन सत्य सांगितले त्याचे स्मरण होते. डॉ. आंबेडकरांनी तेव्हा सांगितले होते- ‘जर या नवीन राज्यघटनेप्रमाणे गोष्टी सुरळीत चालल्या नाहीत तर त्याला कारण आमच्या राज्यघटनेतील दोष नसून मनुष्य, समाजातील अधमपणा हाच असेल असे मला म्हणावे लागेल.’ महाराष्ट्रासह देशात आज जातीपातीचे थैमान सुरू आहे. एक जात दुसऱया जातीविरुद्ध मरण्या-मारण्यासाठी उभी ठाकली आहे. महाराष्ट्रात तर जातीचे प्रकरण हिंसाचारापर्यंत पोहोचले. घटना समितीतील भाषणात डॉ. आंबेडकरांनी हा इशारा दिलाच होता. ते म्हणतात, ‘‘26 जानेवारी 1950 रोजी आम्हाला राजकीय समता लाभेल, पण सामाजिक आणि आर्थिक जीवनात असमता राहील. जर ही विसंगती आपण शक्यतो लवकर नष्ट करण्याचा प्रयत्न केला नाही तर ज्यांना विषमतेची आच लागलेली आहे ते लोक घटना समितीने इतक्या परिश्रमाने बांधलेला हा राजकीय लोकशाहीचा मनोरा उद्ध्वस्त करून टाकल्यावाचून राहणार नाहीत.’’ शेवटी त्यांनी भारतीयांना असे आवाहन केले की, ‘‘ज्या जातीभेदांमुळे सामाजिक जीवनात तट पडले आहेत आणि जाती-जातीत मत्सर आणि शत्रुत्व निर्माण झाले आहे, त्या जातीभेदाचा त्याग करून भारतीयांनी सामाजिक आणि भावनिक अर्थाने एक राष्ट्र बनावे.’’ डॉ. आंबेडकरांचे हे भाष्य म्हणजे भारताच्या आजच्या राजकीय, सामाजिक परिस्थितीचे वास्तव चित्र आहे. डॉ. आंबेडकर हे महामानव होतेच. शून्यातून विश्व निर्माण करणाऱया एका लोकविलक्षण जीवनकथेचे ते

महानायक

आहेत. समाजातील दुःखी, पीडित, उपेक्षित आणि कमकुवत घटकांना आपल्या हक्कांसाठी लढायला डॉ. आंबेडकरांनी शिकविले. आंबेडकरांचे हे खरे राजकीय योगदान आहे. डॉ. आंबेडकरांचा लढा अस्पृश्यतेविरुद्ध होता. त्यांनी लाखो दलित बांधवांसह बौद्ध धर्माचा स्वीकार केला. 1935 मध्ये त्यांनी जाहीर केले की, मी हिंदू म्हणून जन्मलो, परंतु मी हिंदू म्हणून मरणार नाही! त्या वेळी अनेकांनी त्यांना प्रचंड रकमा देऊ केल्या होत्या. त्यांनी त्या वेळी स्वतःच सांगितले होते, ‘‘मी त्यावेळी मुसलमान झालो असतो तर करोडो रुपये माझ्या पायावर येऊन पडले असते.’’ डॉ. आंबेडकरांनी तेव्हा मुसलमान धर्म स्वीकारला असता तर हिंदुस्थानवर प्रचंड आघात झाला असता, पण देशभक्त आंबेडकरांनी बुद्धाचा मार्ग स्वीकारला. बौद्ध धर्म त्यांनी राजकारणासाठी स्वीकारला नाही. तो का स्वीकारला याची चार मुख्य कारणे त्यांनी मे 1956 मध्ये ‘बीबीसी’ला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितली होती – ‘‘फक्त बौद्ध धर्मातच तीन तत्त्वांचे संमिश्रण आहे, जे इतर कोणत्याही धर्मात नाही. प्रज्ञा, करुणा आणि समता.’’ माझ्या धर्मांतराच्या हेतूत कोणताही स्वार्थ नाही. अस्पृश्य राहूनही कोणतीही भौतिक गोष्ट मी मिळवू शकेन. माझ्या धर्मांतराचे प्रमुख कारण आध्यात्मिक आहे.’’ बौद्ध धर्म स्वीकारण्यापूर्वीच डॉ. आंबेडकरांनी आपल्या महाविद्यालयाची नावे ‘सिद्धार्थ’ आणि ‘मिलिंद’ अशी ठेवली होती आणि दादरच्या राहत्या घराचे नाव ‘राजगृह’ असे ठेवले होते. यावरून डॉ. आंबेडकरांच्या ठाम भूमिकेची कल्पना येते. डॉ. आंबेडकरांचा अभ्यास, व्यासंग दांडगा होता. ते प्रचंड प्रतिभेचे पुरुष होते. अस्पृश्यपण काय असते ते स्वतः बाबासाहेबांनी भोगलेले होते. जन्मापासून ते पुढे सुस्थितीत येईपर्यंत सवर्णतेने त्यांना भयंकर छळले होते. तरीही त्यांच्या मनात कुणाविषयी सूडाची भावना नव्हती. मात्र हे सारे बदलायला हवे, त्यासाठी कायद्याचा घाव घालायला हवा, हा विचार त्यांच्या मनात कायम होता. आज बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन. 1956 साली आजच्याच दिवशी भारतीय

राज्यघटनेच्या या शिल्पकाराने

आपला देह ठेवला. आज त्यांच्या महानिर्वाणानिमित्त या प्रज्ञासूर्यास खऱया अर्थाने अभिवादन करायचे तर बाबासाहेबांनी जो विचार देशाला दिला, तो देशवासीयांना स्वीकारावा लागेल. “We must stand on our own feet and fight as best as we can for our rights. So carry on your agitation and organize your forces. Power and prestige will come to you through struggle”. अर्थात ‘आपल्या हिमतीवर, आपल्या पायावर उभे राहा. आपल्या हक्कांसाठी संघर्ष करा, लढा द्या, संघटित होऊन आंदोलने करा. संघर्षाच्या याच एकमेव मार्गाने तुम्ही वाटचाल करीत राहिलात तर सत्ता आणि प्रतिष्ठा तुमच्याकडे चालत येईल’. बाबासाहेबांनी दिलेला हा मूलमंत्र केवळ दलितांसाठी नव्हे, तर समस्त देशवासीयांसाठी होता. बाबासाहेबांच्या महानिर्वाणदिनी या मूलमंत्राचे केवळ स्मरणच करून भागणार नाही, तर त्यासाठी संघटित होऊन संघर्ष करण्यासाठी देशभर जागर करावा लागेल. आज देशात लोकशाहीच्या सर्व स्तंभांवर हल्ले सुरू आहेत. संविधानाची हवी तशी मोडतोड केली जात आहे. लोकशाहीची तमाम मूल्ये पायदळी तुडवून छुप्या पद्धतीने अघोषित हुकूमशाही लादली जात आहे. सरकारे लोकशाही मार्गाने निवडून आणण्याऐवजी सत्तेविरुद्ध बोलणाऱयांना तुरुंगात ठरवून सडवले जात आहे. स्वातंत्र्यापासून आजतागायत एवढी दडपशाही व सत्तेचा इतका गैरवापर देशाने पाहिला वा अनुभवला नव्हता. सत्तेच्या या दमनचक्राविरुद्ध देशाला लढा उभारावाच लागेल. त्यासाठी संघटित होऊन संघर्ष करा, या बाबासाहेबांच्या विचारांची कास देशाला धरावीच लागेल. देशातील लोकशाही व संविधान वाचवायचे असेल तर बाबासाहेबांचे ‘विधान’ हाच एकमेव तरणोपाय आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेबांचे हेच खऱया अर्थाने पुण्यस्मरण ठरेल. ‘संविधान बचाव’चा नारा देत इंडिया आघाडी याच संघटित संघर्षाच्या दिशेने एक-एक पाऊल पुढे टाकत आहे.