सामना अग्रलेख – ‘साथ’ सरो, ‘साथ’ मिळो!

जुन्या वर्षाचा ताळेबंद मांडायचाच तर खूप काही सांगता येईल. अत्यंत यातनादायी आणि वेदनादायक वर्ष म्हणून 2021 ची नोंद इतिहासात होईल. सरत्या वर्षात कोरोनामुळे जे झाले ते होऊन गेले. पण आता नवीन वर्षाचा अरुणोदय झाला आहे. संघर्ष करत एकमेकांना आधार देत कसे जगायचे, हे मावळत्या वर्षाने शिकवले. मात्र, नव्या वर्षात तरी कोरोनाची ही साथ सरावी आणि जगण्यासाठी प्रत्येकालाच बळ व ‘साथ’ मिळावी.

अंधारलेले, संकटांचे व कटू आठवणींचे 2021 हे वर्ष सरून नव्या वर्षाचा पहिला सूर्य प्रकाशमान झाला आहे. अस्त आणि उदय हा सृष्टीचा अनादि काळापासून चालत आलेला नियम. जुने लुप्त होते आणि नवे दिमाखात त्याची जागा घेते. कालगणना सुरू झाल्यापासून जुन्या व नव्या वर्षांचे हे जाणे-येणे अव्याहतपणे सुरू आहे. वर्तमानकाळाचे रूपांतर भूतकाळात होणे हे अटळ आणि चिरंतन सत्य असले, तरी प्रत्येकाची धडपड असते ती चालू वर्तमानकाळात जगण्याची. ‘जुने जाऊ द्या मरणा लागूनि…’ या उक्तीनुसार उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याकडेच सर्वांचा कल असतो आणि सरत्या वर्षात काय बिघडले यापेक्षा नव्या वर्षात काय चांगले घडणार आहे, याची उत्सुकता अधिक असते. त्यामुळेच मावळत्या वर्षातील कटू आठवणींची उजळणी करण्याचे सोडून नवी स्वप्ने, नव्या योजना, आडाखे आणि आशा-आकांक्षांचे नवे संकल्प करत नव्या वर्षाचे स्वागत केले जाते. मावळत्या वर्षाला प्रेमाने निरोप देऊन नवीन वर्षाचे उत्साहात आणि दणक्यात स्वागत करण्याची हौस म्हणूनच तर आपण दरवर्षी पुरवत असतो. त्यात 31 डिसेंबरची मध्यरात्र हा तर बोलून-चालून आंतरराष्ट्रीय सणच. त्यामुळे जगभरातच आतषबाजी वगैरे करून नवीन वर्षाच्या स्वागताचे ‘सेलिब्रेशन’ केले जाते. सालाबादाप्रमाणे यंदाही जगभरातील जनतेने नवीन वर्षाचे त्याच उल्हासात स्वागत केले. मात्र, नव्या वर्षातील संकल्पसिद्धी आणि आडाख्यांचे नियोजन करतानाच अस्तंगत झालेल्या जुन्या वर्षाचे सिंहावलोकनही करायला हवे. मावळत्या वर्षात जगभरातील समस्त मानव जातीचा सर्वाधिक छळ केला तो कोरोनाच्या विषाणूने. 2020 च्या वर्षात जगावर ओढवलेले हे संकट 2021 मध्येही कायम राहिले. पहिल्या वर्षातील लाटेपेक्षा दुसऱ्या वर्षातील कोरोनाच्या लाटेने अधिकच हाहाकार उडविला. मार्च 2021 मध्ये कोरोनाची दुसरी लाट आली. रोज चार लाखांच्या आसपास कोरोनाचे नवीन रुग्ण आढळू लागले आणि

मृतांच्या संख्येने

च्चांक गाठला. ऑक्सिजनची कमतरता, औषधे व इंजेक्शन्सचा तुटवडा यामुळे अनेक रुग्णांना तडफडून प्राण सोडावा लागला. रुग्णालयांतील आक्रोश आणि दुःखाला तर पारावारच उरला नाही. देशातील प्रत्येक व्यक्तीचा कोणी ना कोणी निकटवर्तीय कोरोनाने हिरावून नेला. महाराष्ट्रात तर कोरोनाचा प्रकोप अधिकच होता. केंद्र सरकार, देशभरातील राज्य सरकारे, आरोग्य यंत्रणा कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी आणि रुग्णांवर उपचार करण्यासाठी अहोरात्र झटत होती. मात्र, याच वर्षात कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या आपल्या खंडप्राय देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा कार्यक्रम प्रभावीपणे आणि गतीने राबविला गेला. कोरोनाने केवळ प्राणहानीच केली नाही तर अर्थव्यवस्थेचीही वाताहत केली. बेरोजगारी वाढली, महागाईनेही उच्चांक गाठला. वर्षभरात कोरोनाबरोबरच चक्रीवादळ, ढगफुटी, आगीच्या घटना आणि अपघातांच्या मालिकांनी देशावर आपत्ती आणली. देशाच्या तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांचे लष्कराच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातात निधन झाले. जागतिक पातळीवर विचार करता अमेरिकेतील सत्तांतर ही लक्षणीय घडामोड ठरली. डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करून ज्यो बायडेन अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष झाले आणि त्यापाठोपाठ अफगाणिस्तानातून अमेरिकी सैन्याने माघार घेताच तालिबान्यांनी पुन्हा तिथे आपली राजवट प्रस्थापित केली. पाकिस्तानच्या पाठिंब्यावर अफगाणिस्तानात झालेला हा तख्तापलट भविष्यात हिंदुस्थानसाठी आणि जगासाठीही डोकेदुखी ठरू शकतो. चीनने हिंदुस्थानविरुद्ध उघडलेली आघाडी मावळत्या वर्षातही कायम राहिली. सीमेवरील अनेक भागांत चीनने नवीन गावे वसविण्यास सुरुवात केली. अरुणाचल प्रदेशवर हक्क सांगणाऱ्या चीनच्या सीमेवरील कुरापती या वर्षात अधिकच वाढल्या. राजकीय पातळीवर विचार करता गुजरात, कर्नाटक, आसाम आणि उत्तराखंड या चार राज्यांचे मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाने बदलले. मात्र, केंद्रातील सत्तारूढ पक्ष व

महाशक्तीशाली सरकारला

हादरा बसला तो पश्चिम बंगालमध्ये. ‘खेला होबे’ची घोषणा देत ममता बॅनर्जी यांनी भाजपला पराभूत करण्याचा मार्ग देशातील तमाम विरोधी पक्षांना दाखविला तो याच वर्षात. शेतकऱ्यांच्या मुळावर आलेले तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांनी दिल्लीत उभे केलेले अभूतपूर्व आंदोलन या वर्षाने पाहिले. अखेर दडपशाहीचे सर्व मार्ग फसल्यानंतर मोदी सरकारने सपशेल माघार घेऊन तीनही कृषी कायदे बिनशर्त रद्द केले. मोदी सरकारला वठणीवर आणण्याचे काम सामान्य शेतकऱ्यांनी करून दाखविले तेही याच वर्षात. ऑलिम्पिक स्पर्धेत नीरज चोप्रा या भालाफेकपटूने मिळवलेले सुवर्णपदक आणि वर्षअखेरीस हिंदुस्थानच्या हरनाझ संधू या तरुणीने मिळविलेला ‘मिस युनिव्हर्स’चा किताब ही या वर्षातील जमेची बाजू म्हणावी लागेल. हवामान बदल हा जागतिक चिंतेचा विषय बनला असतानाच स्कॉटलंडमधील जागतिक जलवायू परिषदेत महाराष्ट्राला ‘इन्स्पायरिंग रिजनल लीडरशिप’ अर्थात ‘प्रेरणादायी प्रादेशिक नेतृत्व’ या पुरस्काराने याच वर्षात सन्मानित करण्यात आले. जुन्या वर्षाचा ताळेबंद मांडायचाच तर खूप काही सांगता येईल. अत्यंत यातनादायी आणि वेदनादायक वर्ष म्हणून 2021 ची नोंद इतिहासात होईल. सरल्या वर्षात कोरोनामुळे जे झाले ते होऊन गेले. पण आता नवीन वर्षाचा अरुणोदय झाला आहे. संघर्ष करत एकमेकांना आधार देत कसे जगायचे, हे मावळत्या वर्षाने शिकवले. मात्र, नव्या वर्षात तरी कोरोनाची ही साथ सरावी आणि जगण्यासाठी प्रत्येकालाच बळ व ‘साथ’ मिळावी. नवीन वर्षाचे आगमन झाले असतानाच पुन्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट दार ठोठावत आहे. नव्या वर्षातील पहिल्या सूर्यकिरणांनी कोरोनाचे हे संकट नष्ट व्हावे आणि मराठी व हिंदुस्थानीच नव्हे तर जगभरातील जनतेचे जीवन प्रकाशमन व्हावे!