हॉर्न वाजवल्याचा राग आल्याने सई ताम्हणकरच्या ड्रायव्हरला मारहाण

ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकर ही तिच्या अभिनयामुळे, तिच्याबद्दलच्या गॉसिपमुळे अनेकदा चर्चेत असते. मात्र सई ताम्हणकरबद्दलची चर्चा नव्याने सुरू होण्याचे कारण ठरलं आहे तिचा वाहनचालक. तिच्या वाहनचालकाला 4 जणांनी बेदम मारहाण केली आहे. या मारहाण प्रकरणी चालकाने पोलिसांत धाव घेऊन गुन्हादेखील दाखल केला आहे. सई ताम्हणकरचा वाहन चालक हा 32 वर्षांचा असून त्याला मुंबईतील मालवणी भागात चार तरुणांनी बेल्ट आणि बांबूने मारहाण केली आहे. मालवणीमध्ये काही तरुण वेडीवाकड्या पद्धतीने बाईक चालवत होते. त्यांना हटकण्यासाठी सईच्या ड्रायव्हरने हॉर्न वाजवला होता. ज्यामुळे त्याला ही मारहाण करण्यात आली आहे.

सद्दाम मंडल असं सई ताम्हणकर हिच्या चालकाचं नाव आहे. सद्दाम मंडल हा सई ताम्हणकरकडे 6 वर्षांपासून काम करत आहे. या मारहाणीबद्दल त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी 4 जणांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. सद्दामला होत असलेली मारहाण पाहून त्याचे मित्र त्याच्या मदतीसाठी धावले होते. मारहाण करणाऱ्यांनी इस्माईल खान आणि राजील अन्सारी या त्याच्या मित्रांनाही मारहाण केली आहे.