दखल – एपिलेप्सीसोबतचा प्रवास

>>संध्या सिनकर

‘मैत्री एपिलेप्सी’शी या पुस्तकातून एपिलेप्सी या आजाराविषयी सविस्तर माहिती मिळते. त्याचबरोबर व्याधीचा स्वीकार, त्यावरील उपचार व औषधांशी मैत्री करायला हवी हे समजतं. हे पुस्तक यशोदा वाकणकर यांचे आत्मकथन आहे. वयाच्या सातव्या वर्षी एपिलेप्सी त्यांच्या आयुष्यात आली. तेव्हापासून एपिलेप्सीसहित केलेला त्यांचा प्रवास पुस्तकात छान उतरला आहे. नंतर त्यांची ब्रेन सर्जरी झाल्यावर त्या एपिलेप्सीच्या त्रासातून मुक्त झाल्या. ते सर्व अनुभव त्यांनी शब्दबद्ध केले आहेत. हा प्रवास फक्त एपिलेप्सीचा नाही. तो नात्यांचा, विश्वासाचा आणि माणसं जोडण्याचाही आहे.

यशोदा वाकणकर ही सुप्रसिद्ध समाजसेवक, लेखक डॉ. अनिल व डॉ. अनिता अवचट यांची मुलगी. समाजसेवेचा व प्रगल्भ विचारांचा वारसा त्यांना घरातूनच मिळाला आहे. त्यांची संवेदनशीलता व सहृदयता पुस्तक वाचताना जाणवते. त्यांनी एपिलेप्सीग्रस्त व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबीयांना सहाय्य करण्यासाठी ‘संवेदना’ या स्व-मदत गटाची स्थापना केली. स्व-मदत गटातून समुपदेशन, एपिलेप्सीविषयी जनजागृती, रुग्णांना मोफत औषधे, त्यांच्या लग्नासाठी वधू-वर सूचक मंडळ व रोजगार मेळावे असे अनेक उपाम त्यांनी सुरू केले.

त्यांना लहानपणीच एपिलेप्सीचा त्रास सुरू झाला असला तरी घरातलं वातावरण नेहमी सकारात्मक असे. आईवडिलांनी त्यांना कुठल्याही गोष्टीचा आनंद घ्यायला शिकवले. काही बंधने असली तरी गाण्याचा क्लास, चित्र काढणं, शाळा…सगळं जोरात सुरू असे. डॉ. अनिल व डॉ. अनिता अवचट यांच्यासारखे पालक लाभल्याने त्यांनी यशोदा यांनी एपिलेप्सीचा अवघड प्रवास सोपा करून दिला. यशोदा हिमालयातल्या प्रवासाला गेलेल्या असतानाही त्यांनी एपिलेप्सीबद्दल माहिती सांगून मदतीचा हात पुढे केला आहे. आनंदाने जगण्याचा एक वेगळा दृष्टिकोन त्यांच्याकडे आहे. तो आपल्यालाही शिकावासा वाटतो. त्यांना आलेले एपिलेप्सी मित्रांचे व पालकांचे विविध अनुभव वाचताना मन भरून येते. यशोदाजींची शैली साधी, ओघवती व प्रसन्न आहे. पुस्तकात त्यांचा एपिलेप्सीबरोबरचा प्रवास हळूहळू उलगडत जातो. त्याचबरोबर इतर एपिलेप्सी मित्रांच्या संक्षिप्त कथाही आहेत. अनेक पालकांचे अनुभवही आहेत. हे सगळे अनुभव आपल्या जाणिवेच्या कक्षा रुंद करतात व आपण माणूस म्हणून अधिक समृद्ध होतो.