खासगी साखर कारखान्याचे मळीयुक्त पाणी पाझर तलावात

‘ओंकार ग्रुप’चे श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव फाटा येथील गौरी शुगर ऍण्ड डिस्लरीज् प्रा. लि. युनिट क्रमांक 4 या खासगी साखर कारखान्याने मळीयुक्त आणि रसायनमिश्रित सांडपाणी पाझर तलावात सोडल्याने तलावासह परिसरातील विहिरी, बोअरवेलचे पाणी दूषित झाले आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तर, कारखान्यालगत असलेल्या जंगलातील वन्यप्राण्यांचे जीवन आणि आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे वन विभाग, कारखाना प्रशासन, पर्यावरण नियंत्रण महामंडळ दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

‘ओंकार’ समूह हा साखर उद्योगातील राज्यात दुस ऱ्या क्रमांकाचा ग्रुप आहे. याच ओंकार ग्रुपचा श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव फाटा येथील गौरी शुगर ऍण्ड डिस्लरीज् प्रा.लि. हा साखर कारखाना आहे. या कारखान्यातील मळी, तसेच रसायनमिश्रित पाणी हे शासननियमाप्रमाणे टँकरमध्ये भरून साठवणूक न करता परवानगी घेऊन रस्त्यावर, शेतात तसेच अन्य ठिकाणी सोडणे गरजेचे असते. मात्र, कारखाना प्रशासनाने पर्यावरण नियंत्रण महामंडळाच्या अधिका ऱ्यांना हाताशी धरत शासनाच्या निर्णयाला तिलांजली देत कारखान्याजवळ असलेल्या पाझर तलावात सोडले असून, या पाण्याने तलाव तुडुंब भरला आहे. त्यामुळे परिसरातील बनकरमळा, जाधववस्ती, ठवाळमळा या परिसरातील विहिरी आणि बोअरवेलचे पाणी दूषित झाले आहे. पाणी दूषित झाल्यामुळे जनावरांसह माणसांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कारखान्यालगत असलेल्या जंगलातील ससे, हरिण, लांडगे, कोल्हे या वन्यप्राण्यांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, हे पाणी पिण्याने वन्यप्राण्यांचे जीव आणि आरोग्य धोक्यात आले आहे. या मळीमिश्रित पाण्याची परिसरात दुर्गंधी पसरली असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पर्यावरण नियंत्रण महामंडळाच्या अधिका ऱ्यांनी याची गंभीर दखल घेऊन कारखाना प्रशासनावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

दीड महिन्यांपासून कारखान्यावर गेलोच नाही – बोत्रे

याबाबत ‘ओंकार ग्रुप’चे चेअरमन बाबूराव बोत्रे म्हणाले, ‘मी मागील दीड महिन्यापासून कारखाना कार्यस्थळावर गेलो नसल्याने मला याबाबत काही माहिती नाही. याबाबत कार्यकारी संचालक यांच्याशी संपर्क करावा,’ असे सांगत त्यांनी माहिती देण्यास असमर्थता दाखविली.