सपा नेते दारा सिंह चौहान यांचा राजीनामा, पुन्हा भाजपमध्ये जाणार

भाजप सोडून अखिलेश यांच्या समाजवादी पक्षात दाखल झालेले दारा सिंह चौहान यांनी पक्ष आणि विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. दारा सिंह पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी सपाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

दारा सिंह चौहान हे घोसी विधानसभा मतदारसंघातील सपाचे आमदार होते. भाजपमध्ये प्रवेश करून ते मऊ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात, अशी चर्चा आहे. दारा सिंह यांनी आपला राजीनामा सभापती सतीश महाना यांच्याकडे सुपूर्द केला आहे. सतीश महाना यांनीही त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. योगी यांच्या मागील सरकारमध्ये दारा सिंह हे वन आणि पर्यावरण मंत्री होते. 2022 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत आणि सपामध्ये प्रवेश केला.

दारा सिंह यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला बसपामधून प्रवेश करून सुरुवात केली. दारा सिंह 1996 आणि 2000 मध्ये राज्यसभेचे सदस्यही राहिले आहेत. दारा सिंह यांनी 2009 मध्ये घोसी मतदारसंघातून बसपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. 2015 मध्ये दारा सिंह यांनी बसपा सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2017 मध्ये त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली आणि जिंकली. 2022 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान दारा सिंह स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासह सपामध्ये सामील झाले होते.