दारूला पैसे न दिल्याने वृद्धाचा दगडाने ठेचून खून, संशयित तरुण आठ तासांत जेरबंद

दारूला पैसे न दिल्याने वृद्धाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. सुनील श्रीरंग तरटे (वय 65, रा. राजगुरूनगर झोपडपट्टी, माधवनगर, सांगली) असे खून झालेल्या वृद्धाचे नाव आहे. माधवनगर ते कर्नाळ रस्त्यावरील कंजारभाट वस्तीवर रात्री ही घटना घडली.

खुनाची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी आठ तासांत संशयित विशाल अनिल देसाई (वय 23, रा. राजगुरूनगर झोपडपट्टी, माधवनगर, सांगली) याला ताब्यात घेतले.

संशयित विशाल देसाई आणि मयत सुनील तरटे माधवनगर येथील राजगुरूनगर झोपडपट्टीत राहतात. रात्री विशालने मयत सुनील यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. सुनील यांनी त्याला पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या विशालने डोक्यात दगड घालून तरटे यांचा खून केला. माधवनगर ते कर्नाळ रस्त्यावरील कंजारभाट वस्तीवरील रस्त्यावर ही घटना घडली. डोक्यातून अति रक्तस्त्र्ााव झाल्याने तरटे यांचा मृत्यू झाला.

रात्री साडेनऊच्या सुमारास खुनाची घटना उघडकीस आली. पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, सांगली ग्रामीणचे निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर सहायक निरीक्षक सुशांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंमलदार संतोष माने, मेघराज रूपनर, सुशील मस्के, सचिन कोळी, हिंमत शेख, रणजित घारगे, विठ्ठल माने, विष्णू काळे, संजय बनसोडे यांच्या पथकाने संशयित विशाल देसाई याला ताब्यात घेतले. याप्रकरणी मयत सुनील यांचा मुलगा गणेश तरटे याने फिर्याद दिली. विशाल देसाई याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.