Lok Sabha Election 2024 – आघाडीच्या ऐक्यासाठी…! कोल्हापूर-सांगलीच्या जागांसंदर्भात संजय राऊत यांचं मोठं विधान

काँग्रेस पक्ष हा देशातला मोठा पक्ष आहे. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन प्रादेशिक अस्मिता जपणारे पक्ष आहेत. देशभरातील प्रादेशिक पक्ष एकत्र येऊन ‘इंडिया’ आघाडी झाली आहे. शिवसेना, राष्ट्रवादीसारखे जे पक्ष आहेत, ते राज्याच्या अस्मितेशी जुळलेले आहेत. आम्ही राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड किंवा झारखंडमध्ये जागा मागत नाहीये. प्रादेशिक पक्ष आपल्या राज्यात जास्त जागा मागतात. कारण त्यांचे अस्तित्व, त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांचा संघर्ष हा त्यावर अवलंबून असतो. यामुळे आमच्यात तसे मतभेद नाहीत. एखाद दुसरी जागा असते, त्यावर दोन्ही बाजूंनी कार्यकर्ते दावा करतात. नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यांचा दबाव असतो, अशी माहिती आघाडीतील जागावाटपाबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी दिली.

मतमतांतरे असण्यात काहीच गैर नाही. महाविकास आघाडीतील पक्षांचे आपआपले गड आहेत. वंचित बहुजन आघाडीचेही गड आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात चारही पक्ष पसरलेले आहेत. यामुळे कार्यकर्त्यांचा दबाव नेत्यांवर असतो. ही जागा आपल्याकडेच राहावी, असा प्रयत्न असतो. जसे की भिवंडीच्या जागेचे उदाहरण. भिवंडीची जागा भाजप जिंकत आला आहे. आम्ही सगळे एकत्र आलो तर भिवंडीची जागा भाजपच्या हातून आम्ही काढून घेऊ. आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भिवंडीची जागा लढण्यासाठी दावा केला आहे. तर काँग्रेस म्हणते ती जागा आम्हाला हवी. अशाच प्रकारे एक-दोन जागांवर शिवसेना-काँग्रेसमध्येही चर्चा सुरू आहे. याचा अर्थ ही कुठली रणनीती नाहीये, असे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

कोल्हापूरची जागा ही शिवसेनेने हसत हसत सोडली. कोल्हापूरमधून शिवसेना लोकसभेवर जाणार नाही, याच्या आम्हाला यातना झाल्या. तिथे छत्रपती शाहू महाराज काँग्रेस, शिवसेना किंवा राष्ट्रवादीकडून लढण्यास इच्छुक असतील तर आम्ही सर्व मिळून ती जागा त्यांना देऊ. म्हणून आमचे कार्यकर्ते म्हणतात की सांगलीची जागा लढवूया. शेवटी आपण सगळे एकत्र आहोत. मग आपण सांगली लढवूया. काँग्रेस म्हणते ही आमची परंपरागत जागा आहे. आता सांगलीच्या या जागेवर चर्चा होऊन मार्ग निघेल. आम्हाला वाटतंय, या जागेवरून शिवसेना लढली तर, ही जागा यावेळी जिंकू. गेल्या दोन निवडणुकांपासून ही जागा भाजप जिंकत आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.

आज सकाळीच माझी शरद पवारसाहेबांसोबत या विषयावर चर्चा झाली आहे. आज आमची बैठक होणार आहे. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आम्ही कोल्हापूरला रवाना होऊ. कोल्हापूरला आम्ही श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना भेटू. निवडणुकीसाठी त्यांना शुभेच्छा देऊ. निवडणुकीसाठी कोल्हापूरच्या गादीचे आम्ही आशीर्वादही घेऊ. त्यानंतर आम्ही सांगलीत वसंतदादा पाटील यांच्या स्मारकावर जाऊन त्यांना आदरांजली अर्पण करू. आणि मग सांगलीतील मिरमध्ये उद्धवसाहेबांची सभा होणार आहे. तिथे आम्ही जाऊ, असे संजय राऊत म्हणाले.

सांगलीच्या जागेसाठी आम्ही ठाम आहोत. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरची जागा महाविकास आघाडीच्या ऐक्यासाठी दिलेली आहे. त्यानंतर हातकणंगलेच्या जागेसाठी राजू शेट्टी यांच्याशीही चर्चा सुरू आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात आमच्याकडे एखादी जागा असावी, आणि ती आम्ही ताकदीने लढावी, अर्थात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीने ही आमची भूमिका असेल तर, त्यात चुकीचं आहे असं मला वाटत नाही, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

वंचित बहुजन आघाडी म्हणजे माननीय बाळासाहेब आंबेडकर, हे सन्माननीय नेते आहेत. त्यांच्याशी आमची अनेकदा चर्चा झाली. महाराष्ट्रात चार जागांवर त्यांनी लढावं, त्यांनी सूचना केलेल्या. हा प्रस्ताव आम्ही दिल्यावर त्यांची वेगळी भूमिका आम्हाला दिसतेय. तो प्रस्ताव जर त्यांनी मान्य केला असता तर नक्कीच आम्हाला आनंद झाला असता. या हुकूमशाही विरुद्धच्या आणि संविधान वाचवण्याच्या लढ्याला बाळासाहेब आंबेडकरांच्या आमच्या सोबत असण्याने गती आणि बळ नक्कीच मिळालं असतं. पण मला अजूनही खात्री आहे. सगळे प्रमुख नेते एकत्र बसतील. आणि पुन्हा माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी चर्चा करतील. त्यांच्या मनात नाराजी, अस्वस्थता असेल तर ती दूर करण्यात आम्हाला यश येईल. कारण या महाराष्ट्रातला वंचित, दलित, शोषित समाज हा या लढ्यामध्ये आमच्यासोबत असायलाच पाहिजे, ही आमची भूमिक आहे, असे संजय राऊत पुढे म्हणाले.

पंतप्रधान मोदी आमचं भाषण लक्षपूर्वक ऐकतात का? महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यात भाषण होतंय, त्यातील दोन चार वाक्य  देशाचे पंतप्रधान उचलतात आणि त्यावर आपली पुढील रणनीती बनवतात. राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये भाषण केले. त्यात एका शक्तीचा उल्लेख केला. एक शक्ती मोदींच्या पाठीमागे आहे. आता मोदी त्या शक्तीच्या नावाने रडगाणे गात आहेत. पण राहुल गांधींनी ज्या शक्तीचा उल्लेख केला, ती धनशक्ती आहे. दैवी शक्ती नाही तर, अघोरी शक्ती आहे, असे म्हटल्याने मोदीजी रडत बसलेत. सतत रडण्याची मोदींची जी सवय आहे ती चांगली नाहीये. ते देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांनी रडगाणं बंद केलं पाहिजे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

जिथे छत्रपती शिवाजी महाराज यांची माता म्हणजे राजमाता जिजाऊ यांचा जन्म झाला, तिथे आमची सभा झाली. महाराष्ट्रावर काही लोक दिल्ली, गुजरातमधून आक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण महाराष्ट्राने ज्या प्रकारे औरंगजेबचे आक्रमण मोडून काढले, लढाई केली आणि महाराष्ट्रातच औरंगजेबची कबर बांधली. अशाच प्रकारे आम्ही हे आक्रमणही संपवू. महाराष्ट्रात औरंगजेबची वृत्ती चालणार नाही, असे आम्ही म्हटले होते. यात मोदींचा काय संबंध? ते आपल्या सोयीने काहीही अर्थ काढतील. त्यांची डिक्शनरी वेगळी आहे. आमची देशभक्ती आणि राष्ट्रवादाची डिक्शनरी आहे. त्यांची स्वार्थाची आणि राजकीय डिक्शनरी आहे. तुम्ही पंतप्रधान आहात, त्या पदाची प्रतिष्ठा राखा. हे रडगाणं बंद करा. खूप झालं. 10 वर्षे जनतेनं तुमचं रडगाणं बघितलं आहे, अशी कडाडून टीका संजय राऊत यांनी केली.

कोण म्हटलं गरीब आशीर्वाद देतायेत तुम्हाला? हे या निवडणुकीत कळेल. गरीब ईव्हीएमला शिव्या देत आहेत. ईव्हीएमला शिव्या देणं म्हणजे भाजपला शिव्या देणं. तळतळाट करतायेत ईव्हीएमचा. लफंगे करून जिंकूण येताय. औरंगजेब सुद्धा हेच करत होता. औरंगजेबचीही हीच खा-खा वृत्ती होती. कुणीही विरोधक राहू नये, यासाठी औरंगजेबची महाराष्ट्रावरची चाल होती. सगळ्यांनी आपल्या पक्षात यावं, दुसरं कोणी समोर राहू नये ही औरंगजेबची वृत्ती होती. ही वृत्ती आहे आणि या वृत्तीच्या संदर्भात आम्ही चर्चा केली. यामुळे मोदींनी त्यांचे मगरीचे अश्रू ढाळणं बंद करावं. आता ते देशाचे पंतप्रधान आहेत. निदान या काळात तरी त्यांनी देशाची आणि पदाची प्रतिष्ठा सांभाळावी, असे म्हणत संजय राऊत यांनी निशाणा साधला.