निवडणूक आयोगाने माती खाल्ली, मतदानानंतर 11 दिवसांनी टक्केवारी वाढली कशी? – संजय राऊत

लोकसभा निवडणुकीसाठी पार पडलेल्या पहिल्या दोन टप्प्यातील मतदानाची टक्केवारी अचानक वाढली आहे. निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर 11 दिवसांनी आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर 3 दिवसांनी मतदानाची नव्याने आकडेवारी प्रसिद्ध केल्यानंतर ही बाब समोर आली आहे. या वाढलेल्या टक्केवारीवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रहार केला असून निवडणूक आयोगाने माती खाल्ली असून मतदानानंतर 11 दिवसांनी टक्केवारी वाढली कशी? असा परखड सवाल उपस्थित केला आहे. ते सांगली येथे पत्रकारांशी संवाद साधत होते.

पहिल्या टप्प्याच्या मतदानानंतर 11 दिवसांनी आणि दुसऱ्या टप्प्याच्या मतदानानंतर तीन दिवसांनी दिलेले आकडे धक्कादायक आहेत. साधारण सर्व मतदारसंघात 6 ते 7 टक्के मतदानात वाढ झाल्याचे आयोगाच्या नव्या आकडेवारीत समोर आले आहे. भारताच्या निवडणूक आयोगावर किती विश्वास ठेवायचा हे आम्ही म्हणतो त्याला एकप्रकारे दुजोरा देण्याचाच हा प्रकार आहे. निवडणूक आयोग मोदी-शहांच्या पकडीत गुदमरलेला आहे, असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला.

ईव्हीएम यंत्रणा असो किंवा आचारसंहिता उल्लंघणाची प्रकरणं असो किंवा शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर निवडणूक आयोगाने दिलेले निर्णय असो. त्यात आता आणखी एकाची भर पडली असून पहिल्या दोन टप्प्यात साधारण 6 ते 7 टक्के मतं अचानक वाढल्याचे दाखवत आहेत. नांदेडला मतदान संपले तेव्हा 52 टक्के मतदान झाले होते. त्यात अर्धा किंवा एक टक्का फरक दुसऱ्या दिवशीपर्यंत पडू शकतो. पण 52 टक्क्यांचे 62 टक्के कसे होऊ शकतो. देशभरात ज्या सर्व मतदारसंघात मतदान झाले तिथे साधारण या पद्धतीचे आकडे आयोगाने जाहीर केले असून हे धक्कादायक आहे. मतदानाचे आकडे जाहीर करण्यासाठी 11 दिवस लागतात का? असा सवालही राऊत यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, हे डीजिटल इंडिया आहे. किती मतदान झाले हे संध्याकाळी आम्हाला आतापर्यंत समजत होते. त्यानुसार आकडेही आले. पण आश्चर्य असे की फक्त नागपूरमध्ये अर्धा टक्के मतदान कमी झाल्याचे दाखवत असून हा एक वेगळाच घोळ आहे. नागपूर सोडून सगळीकडे 7 टक्के मतदान वाढले आहे. हे मतदान वाढले कसे? वाढलेले मतदान कुठे गेले? कुणी केले? हे जाहीर करायला 11 दिवस का लागले? हा देशाला पडलेला प्रश्न आहे.

कुछ तो गडबड है… मतदानानंतर 10 दिवसांनी डेटा केला जारी, कारभारावर विरोधकांचे प्रश्नचिन्ह

भारताचा निवडणूक आयोग हा भारताचा राहिला नसून मोदी-शहा या कारस्थानी राजकारण्याच्या हातातले बाहुले झाले आहे का? असा सवाल करत खासदार राऊत पुढे म्हणाले की, पाकिस्तानातील निवडणुका लष्कराच्या हातात असतात. कुठल्या मतदारसंघात कुणी जिंकायचे, कोणत्या पक्षाला आघाडी आणि कोणत्या पक्षाला पिछाडीवर ठेवायचे हे लष्कर ठरवते. त्याप्रमाणे आपल्या देशातील निवडणूक आयोगाने जो घोळ सुरू केला त्यामागे कोणीतरी अदृश्य शक्ती आहे, अशी शंकाही राऊत यांनी व्यक्त केली.

मतदान कमी झाल्यामुळे भारतीय जनता पक्ष अनेक मतदारसंघात पिछाडीवर पडला अशा प्रकारची विश्लेषणं आल्यानंतर 11 दिवसांनी त्या मतदारसंघातील नवीन आकडे समोर आले. कुठे 11 टक्के, तर कुठे 7 टक्के वाढ झाली. हे वाढलेले मतदान आले कुठून? मतपत्रिकेवर मतदान होत होते तेव्हाही सायंकाळी 7 पर्यंत किती मतदान झाले याचे तंतोतंत आकडे यायचे. यावेळी डीजिटल इंडिया करूनही मतदानाच्या दिवशी सायंकाळी आलेले आकडे आणि 11 दिवसांनी जाहीर झालेले आकडे वेगळे आहेत. जगात कुठेही मतदानाच्या 11 दिवसानंतर टक्केवारी जाहीर होत नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने पुन्हा माती खाल्ली असून ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे, असा आरोप खासदार राऊत यांनी केला.