महाराष्ट्रात शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचेच राजकारण टिकेल

महाराष्ट्रात भविष्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या दोन नेत्यांचेच राजकारण टिकणार, असा दावा शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आज केला. उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे दोनच नेते महाराष्ट्रात पुढे यशस्वी झालेले दिसतील असे ते म्हणाले.

शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नुकतीच भेट झाली. त्यावर संजय राऊत यांनी वरील प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “मी शरद पवार यांना ओळखतो. अजित पवार आणि शरद पवार कितीही एकत्र दिसले तरी 2024 च्या निवडणुकीत शरद पवार त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाला माती चारल्याशिवाय राहणार नाही. काही कौटुंबिक आणि संस्थात्मक गोष्टी असतात. दोघांचे मैदानदेखील बारामती आहे. पण बारामतीही शरद पवारच मारतील. महाराष्ट्रातदेखील शरद पवारच असतील.

मागील काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार या दोनच नेत्यांचे राजकारण होते. शरद पवार आज पुन्हा एकदा संकटातून उभे राहत आहेत, नेतृत्व करत आहेत. बाळासाहेब ठाकरे हयात नाहीत. पण त्यांच्या विचारांची मशाल घेऊन उद्धव ठाकरे पुढे निघाले आहेत, असे संजय राऊत म्हणाले.