मोदी सरकारचा न्यायालयाला न जुमानण्याचा इस्रायली फॉर्म्युला, संजय राऊत यांची मोदी सरकारवर टीका

केंद्रातील मोदी सरकारने देशात एक इस्रायली फॉर्म्युला आणला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा कोणताच निर्णय मानायचा नाही त्यात हवा तसा बदल करू असा हा फॉर्म्युला असल्याची टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांच्या नियुत्त्यांवर नियंत्रण ठेवणारे वादग्रस्त विधेयक मंजूर करवून घेण्यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील आहे. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

दिल्लीमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना राऊत यांना या विधेयकाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. हे विधेयक गेल्या अधिवेशनात राज्यसभेत मांडण्यात आले होते. या विधेयकानुसार त्रिसदस्यीय समिती मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणुक आयुक्तांची नियुक्ती करेल. या समितीत पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि कॅबिनेट मंत्री यांचा समावेश असणार आहे. समितीतून सरन्यायाधीशांना वगळण्यात आले आहे. या संदर्भात बोलताना राऊत यांनी म्हटले की, “सरकारने सर्वोच्च न्यायालयाचा कोणताच निर्णय मानायचा नाही त्यात हवा तसा बदल करू हा इस्रायली फॉर्मुला इथे आणला आहे. आदी पेगॅसस आणलं आता लोकशाही खतम करण्याचा, न्यायालयाला न मानण्याचा इस्रायली फॉर्म्युला आणला आहे.