पंतप्रधान कार्यालयाची 24 तास नजर, केजरीवालांसाठी तिहार तुरुंग बनला टॉर्चर रुम; ‘आप’चा गंभीर आरोप

आम आदमी पार्टीचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नायब राज्यपास व्ही के सक्सेना यांना पत्र लिहिले आहे. तिहार तुरुंग अरविंद केजरीवाल यांच्यासाठी टॉर्चर रुम बनल्याचा आरोप या पत्रामध्ये सिंह यांनी केला आहे.

कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 21 मार्च रोजी अटक झाली. सध्या ते तिहार तुरुंगामध्ये कैद आहेत. हे तुरुंग केजरीवाल यांच्यासाठी टॉर्चर रुम बनल्याचा आरोप संजय सिंह यांनी केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान कार्यालयाद्वारे (पीएमओ) अरविंद केजरीवाल यांच्यावर 24 तास नजर ठेवली जात आहे. असे वाटतेय की कोणीतरी मोठा हेर केजरीवाल यांची हेरगिरी करतोय, असे सिंह यांनी चिठ्ठीत नमूद केले आहे.

केजरीवाल यांना 23 दिवस इन्सुलिन देण्यात आले नाही. दिल्लीची सेवा करणे हा केजरीवाल यांचा गुन्हा आहे का? त्यांच्याशी वैयक्तीक शत्रुत्व का? विरोधी नेत्याचा जीव घेऊन तुम्ही त्यांना संपणार आहात का? असा सवाल तर पंतप्रधान कार्यालय आणि नायब राज्यपाल यांच्या डोळ्यादेखत हा प्रकार होत आहे, याचे आपल्याला दु:ख होत असल्याचे सिंह म्हणाले.

तिहार तुरुंगात कैद्यांमध्ये झालेल्या जीवघेण्या राड्याचाही उल्लेख सिंह यांनी पत्रामध्ये केला असून अरविंद केजरीवाल यांच्या सुरेक्षाबाबत चिंता व्यक्त केली आहे. तिहार तुरुंगामध्ये याआधी हत्याही झाल्याचे सिंह यांनी म्हटले आहे. उद्या केजरीवाल यांच्यावर असा हल्ला झाला तर काय? त्यांच्या जिवाला धोका असल्याचेही सिंह म्हणाले.