‘साठवणीतील माणसं’ पुस्तकातील व्यक्तिमत्त्वांमध्ये प्रत्येकाचं वेगळेपण! ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांचे प्रतिपादन

‘साठवणीतील माणसं’ या पुस्तकातील आपल्या लेखांमधून दिलीप प्रधान यांनी यात चितारलेल्या सर्व व्यक्तिमत्त्वांमधील प्रत्येकाचे स्वतःचे असे वैशिष्टय़ आणि वेगळेपण आहे. तसेच त्यांच्यातील समाजहिताबद्दल असलेली तळमळ, कार्यमग्नता आणि सच्चेपण हे या सर्व व्यक्तिमत्त्वांमध्ये सामाईक आहे. दिलीप प्रधान यांनी वृत्तपत्रासाठी 25-30 वर्षांपूर्वी केलेले हे लेखन आहे. वास्तविक, ते पूर्वीच पुस्तकरूपात प्रकाशित व्हायला हवे होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक विजय कुवळेकर यांनी केले.

पत्रकार, लेखक दिलीप प्रधान यांनी लिहिलेल्या ‘साठवणीतील माणसं’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच माजी केंद्रीय गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते मुलुंड पूर्व येथील मराठा मंडळ संस्थेच्या सभागृहात झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक विजय कुवळेकर होते, त्यावेळी ते बोलत होते.

दिलीप प्रधान यांनी या पुस्तकात कॉ. श्रीपाद अमृत डांगे, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, अहिल्याबाई रांगणेकर, नानी पालखीवाला, ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर, जॉर्ज फर्नांडिस, मधू लिमये, गृह सचिव राम प्रधान, स्वातंत्र्यसैनिक दत्ता ताम्हणे आणि ग. प्र. प्रधान अशा दहा जणांची व्यक्तिचित्रे चितारलेली आहेत. या दहा व्यक्तींनी केलेल्या अजोड कार्याला आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न पुस्तकाद्वारे केल्याचे दिलीप प्रधान यांनी सांगितले. तसेच या पुस्तकातील व्यक्तींना भेटून मुलाखती घेण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी तत्कालीन संपादक राधाकृष्ण नार्वेकर आणि विजय कुवळेकर यांचे आभार मानले.

लेखक दिलीप प्रधान यांनी उत्तम पुस्तक लिहिल्याबद्दल सुशीलकुमार शिंदे आणि महाराष्ट्राचे माजी सभापती अरुण गुजराथी यांनीदेखील त्यांचे कौतुक केले आणि यातील बहुतेक सर्वच व्यक्तींबरोबर एकेकाळी आपले राजकीय आणि व्यक्तिगत संबंध असल्याचे सांगून त्यांच्याविषयीच्या अनेक आठवणी उलगडल्या.

कार्यक्रमाला ज्येष्ठ नाटय़ दिग्दर्शक विजय केंकरे, ज्येष्ठ चित्रपट समीक्षक अशोक राणे, अजित तेंडुलकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिद्धार्थ प्रकाशनचे शिवाजी धुरी यांनी केले, तर सूत्रसंचालन मृण्मयी देशपांडे हिने केले. हे पुस्तक सिद्धार्थ प्रकाशनतर्फे प्रकाशित करण्यात आले आहे.