मालाडमध्ये शाळेचे पाडकाम; ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे परिसरातील नागरीक धुळीमुळे त्रस्त

मालाडच्या गोविंद नगर येथील हाजी बापू मार्गावरील महापालिका शाळेची इमारत धोकादायक झाल्याने सध्या त्याचे पाडकाम सुरू आहे. मात्र, हे काम करताना कंत्राटदार आणि संबंधितांनी योग्य ती काळजी घेतली नसल्याने परिसरातील नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. तसेच अनेकांना धुळीमुळे त्रास होत आहे. त्यामुळे प्रशासनाने याची योग्य ती दखल घ्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

मुंबईत प्रदूषणाची समस्या वाढत असून प्रशासनाने बांधकाम आणि पाडकाम करताना नियमावली ठरवली आहे. या नियमामुळे या कामादरम्यान धूळ उडणार नाही आणि प्रदूषण वाढणार नाही. मात्र, या शाळेच्या पाडकामादरम्यान संबंधितांकडून नियमांचे उल्लंघन होत आहे. त्यांच्या दुर्लक्षामुळे परिसरातील नागरीक धुळीमुळे त्रस्त झाले आहेत. तसेत येथील डेब्रीज नेण्यासाठी वाहने शाळेच्या मैदाना वापर करत आहेत. त्यामुळे मैदानाची माती उडत असून त्याचाही त्रास होत आहे. तसेच डंपरमुळे मैदान आणि रस्त्यांचेही नुकसान होत आहे. येथील रस्ते अरुंद आहेत. तसेच परिसरात बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन अपघाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेत योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.